नवरात्र म्हटल्यावर घरोघरी घट बसतात. मग रोज देवीची आरती, सवाष्णिंना बोलवून त्यांना वाण देण्याची पद्धत, काही जणांकडे पंचमीला तर काहींकडे अष्टमीला कुमारीकांना, महिलांना बोलवून त्यांची ओटी भरली जाते. ओटी भरण्याला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. सवाष्णींना वाण दिल्याने पुण्य लागते या श्रद्धेने आणि दानधर्म करायला हवा या हेतूने नवरात्रात आवर्जून घरोघरी महिलांची ओटी भरतात. पूर्वी ओटी भरायची म्हणजे खणा-नारळाची ओटी असं म्हटलं जायचं. खण म्हणजे ब्लाऊज पीस दिला जायचा. त्याला पर्याय म्हणून नंतर रुमाल किंवा नॅपकीन दिला जायचा. मात्र आता ओटी म्हणून ब्लाऊज पीस देणे काहीसे मागे पडले. कारण या ब्लाऊजपीसचा आपल्याला उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे ब्लाऊज पीसच्या ऐवजी एखादी लहानशी वस्तू ओटीत वाण म्हणून दिली जाते. आता नवरात्रीत सवाष्णींना काय द्यावे असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच असतो, त्यासाठी काही सोपे पर्याय (Navratri 2022 Gift Ideas)...
१. कानातले
बाजारात खड्यांचे, मोत्यांचे, डिझायनर असे बरेच कानातले मिळतात. महिलांना साधारणपणे वेगवेगळे कानातले आवडत असल्याने अगदी ५० ते १०० रुपयांपासून बरेच पर्याय यामध्ये उपलब्ध असतात.
२. स्कार्फ किंवा स्टोल
सध्या कुर्ता किंवा जीन्सवरचा टॉप यावर स्कार्फ घ्यायची चांगलीच फॅशन आहे. इतकेच नाही तर कधी उन्हासाठी किंवा थंडीसाठीही स्कार्फ किंवा स्टोलचा वापर होतो. बाजारात वेगवेगळ्या डिझाईन्सचे, रंगांचे आकर्षक स्टोल मिळतात. यांची किंमत १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत असते.
३. लिपस्टीक किंवा काजळ
हा सगळ्या महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. आवरुन कुठे बाहेर जायचं म्हटलं की आपण सगळेच आवर्जून लिपस्टीक किंवा काजळ लावतो. बाजारात बरेच ब्रँड असून अगदी १०० रुपयांपासूनही ही उत्पादने खरेदी करता येतात.
४. स्लींग पर्स
अनेक महिला सकाळी चालायला किंवा जीमला जातात. तसंच घाईत भाजी आणायला, मुलांना सोडवायला जातात. अशावेळी गळ्यात एखादी लहानशी स्लिंग बॅग अतिशय आवश्यक असते. मोबाईल, गाडीची किल्ली थोडे पैसे इतकं मावणारी लहान स्लींग पर्स अगदी १०० रुपयांपासून मिळते.
५. सुकामेवा
महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात. मात्र त्यामध्ये अनेकदा त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी महिलांना सुकामेव्याचे लहान पुडे दिले तर किमान नवरात्रीमध्ये त्या नक्की तो खाऊ शकतात.