Join us  

नवरात्र विशेष : अष्टमीला वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा स्वस्तात मस्त पर्याय-द्या सुरेख वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 11:18 AM

Navratri Special vaan ideas gift shopping tips : खरेदी सोपी व्हावी यासाठी वाणाचे काही छान पर्याय

नवरात्र म्हणजे राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. कुमारीका, सवाष्ण ही देवीची रुपं मानली जात असल्याने त्यांची नवरात्रात आवर्जून पूजा केली जाते. घट बसवणे, देवीची पूजा-आरती करणे हे जसे भक्तीभावाने केले जाते त्याचप्रमाणे  या दरम्यान सवाष्णींना वाण देणेही अतिशय चांगले मानले जाते. अष्टमी, नवमीला सवाष्णींना बोलवून त्यांची ओटी भरली जाते. ओटीमध्ये खण-नारळ देण्याची पद्धत आहेच पण आता त्यासोबत उपयुक्त अशी एखादी वस्तूही दिली जाते (Navratri Special vaan ideas gift shopping tips). 

महिलांना उपयोगी अशी कोणती वस्तू द्यायची असा प्रश्न अनेकींना पडतो. सतत तेच तेच देण्यापेक्षा वेगळं काहीतरी देऊया, ही वस्तू आवडेल अशी, उपयोगात येईल अशी आणि आपल्या खिशाला परवडेल अशी असायला हवी. हा सगळा विचार करुन आपण खरेदीला जातो आणि बाजारात गेल्यावर नेमकं काय घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. पण ही खरेदी सोपी व्हावी यासाठी आज आपण वाणाचे काही छान पर्याय पाहणार आहोत.  

(Image : Google)

१. बाटली/ग्लास 

हल्ली बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या छान बाटल्या आणि ग्लास मिळतात. महिला कामाच्या नादात कमी पाणी पितात. पण त्यांनी वेळच्या वेळी भरपूर पाणी प्याव तर त्यांना छान वेगळ्या आकाराचे, रंगांचे ग्लास किंवा बाटली देऊ शकता. याचा रोजच्या रोज उपयोग होतो. 

२. काजळ/ मॉईश्चरायजर

स्कीन केअर किंवा मेकअप ही आता काळाची गरज झाली आहे. अगदी खूप काही नाही पण किमान रोजच्या रोज मॉईश्चरायजर तर लावायलाच हवं. असंच एखादं चांगलं मॉईश्चरायजर किंवा काजळ आपण सवाष्णींना दिलं तर त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.

(Image : Google)

३. पाऊच सेट

घरात मेकअपचे सामान, पेन-पेन्सिल, पैसे, औषधं किंवा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच पाऊच लागतात. असे कितीही पाऊच हाताशी असले तरी आपल्याला ते कमीच पडतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे छान पाऊचेस उपलब्ध असून अशा पाऊचचा एखादा सेट तुम्ही वाण म्हणून नक्की देऊ शकता. 

४. कानातले/ब्रेसलेट

बहुतांश महिला ऑफीसला जाताना थोडे ट्रेंडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतात. आजकाल ऑनलाइलही अतिशय सोबर आणि छान अशा अॅक्सेसरीज मिळतात. रोजच्या वापरासाठी या वस्तू लागत असल्याने आणि महिलांच्या आवडीची गोष्ट असल्याने असे वाण मिळाल्यावर त्याही नक्की खूश होतील.

(Image : Google)

५. स्कार्फ/स्टोल

बऱ्याच मुली किंवा महिला उन्हात किंवा थंडीत बाहेर पडताना डोक्याला आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधतात. इतकेच नाही तर कधी स्टाईल म्हणून जीन्स किंवा कुर्त्यावरही एखादा स्कार्फ पेअर केला जातो. रंगबिरंगी स्टोल किंवा स्कार्फ स्वस्तात मस्त मिळतात. वाणासाठी हा चांगला पर्याय ठरु शकतो.   

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीगिफ्ट आयडियाखरेदी