दिवाळी आली की नवनवीन कपडे, रोषणाई, फटाके फराळ यांची चंगळ असते. यातच आणखी एक मजा असते ती म्हणजे एकमेकांकडून मिळणाऱ्या गिफ्टसची. आपल्याला काय गिफ्ट मिळतात यासाठी आपण उत्सुक असलो तरी आपण काय गिफ्ट द्यायचे हे मात्र आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाही. मग ऐनवेळी होणारी धावपळ आणि पाहिजे ते न घेता येणे असे घडते. मुलींना घेण्यासारख्या खूप गोष्टी असतात पण मुलांना काय द्यायचं काही कळत नाही. ही अवस्था आपल्यातील अनेकींची होते. भाऊबीज आणि पाडवा यादिवशी भावाला आणि नवऱ्याला काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या गिफ्टचे काही हटके पर्याय... या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा
१. तुमच्या भावाची आणि नवऱ्याची चॉईस तुम्हाला साधारणपणे माहित असते. त्यांच्या आवडीप्रमाणे गोष्टी खरेदी करा. नाहीतर त्यांना तुम्ही दिलेले गिफ्ट आवडले नाही तर ते तसेच पडून राहण्याची शक्यता असते.
२. गिफ्ट खरेदी करतानाच दुकानदाराकडून बदलून मिळेल याची खात्री करुन घ्या. त्यासाठी पावती जपून ठेवा. म्हणजे साइज, रंग असे न आवडल्यास तुम्ही ते त्याच दुकानातून बदलून घेऊ शकता.
३. गिफ्ट खरेदी केले तरी त्याचा टॅग काढून टाकायची घाई करु नका. गिफ्ट दिल्यानंतर ते समोरच्या व्यक्तीला आवडले नाही किंवा अन्य कारणामुळे बदलावे लागले तर टॅग आवश्यक असतो.
४. भावाला किंवा नवऱ्याला गिफ्ट द्यायचं असेल आणि तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही हाताने बनवलेलं एखादं कार्ड किंवा वस्तू दिल्यास ते त्यांच्यासाठी आणखीनच खास ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे एखादी कला असल्यास तिचा वापर करून तुम्ही समोरच्याला खूश करु शकता.
गिफ्टचे हटके पर्याय
१. कस्टमाइज गिफ्ट
सध्या कस्टमाइज्ड गिफ्टची खूप फॅशन असल्याचे पाहायला मिळते. मग यावर त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा फोटो किंवा त्यांचे नाव आपल्याला घेता येऊ शकते. कुशन, कुशन कव्हर्स, कॉफी मग, फोटो फ्रेम, घड्याळ, बेडशीट्स, टीशर्ट्स, स्लीप वेअर सेट्स असे बरेच पर्याय उपलब्ध असतात. फक्त हे गिफ्ट द्यायचं असल्यास थोडा आधीपासून विचार करून त्या गोष्टी बनवून घ्यावा लागतील एवढंच.
२. पुस्तके
तुमच्या भावाला, नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला वाचनाची आवड असेल तर तुम्ही काही पुस्तके त्यांना नक्की भेट म्हणून देऊ शकता. यामध्ये त्यांना आवडणाऱ्या जॉनरविषयीची पुस्तके निवडा. तसेच सध्या काही प्रकाशक किंवा पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या वाचकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्सही आणल्या आहेत. त्या ऑफर्सचा तुम्ही नक्की विचार करु शकता. पुस्कते कायम सोबत राहणारी गोष्ट आहे. यामध्ये बुक व्हाऊचर्सचाही पर्याय असतो. यातली आणखी एक फायद्याची बाब म्हणजे यानिमित्ताने तुम्हालाही ती पुस्तके वाचायला मिळतील. पुस्तकांबरोबरच दिवाळी अंकही भेट म्हणून देऊ शकता.
३. शॉर्ट किंवा लॉंग टूर
गेल्या २ वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण सगळेच घरात आहोत. दिवाळीची सुट्टी म्हणजे एखादी छोटी ट्रीप तर व्हायलाच हवी. अशावेळी तुम्हीही दिवाळीची कामे आणि ऑफीसचे काम करुन कंटाळला असाल तर नवऱ्याला एखादी २ दिवसांची किंवा त्याची सोय बघून जास्त दिवसांची टूर गिफ्ट म्हणून देऊ शकता. या आगळ्यावेगळ्या गिफ्टमुळे नवरोबा खूश नाही झाले तरच नवल. पण बावाला किंवा बॉयफ्रेंडला अशाप्रकारचे गिफ्ट द्यायचे असल्यास ट्रीप कंपनीकडून आधीच तारखा बदलून मिळतील याची खात्री करुन घ्या. काहीच नाही तर २ दिवसांसाठी एखाद्या जवळच्या फार्म हाऊसचे बुकींग तर तुम्ही नक्कीच करु शकता.
४. गिफ्ट कार्ड
हल्ली बरेच मॉल किंवा मोठमोठे ब्रँड आपली गिफ्ट कार्ड विक्रीसाठी ठेवतात. त्यामुळे विशिष्ट वस्तू खरेदी न करता गिफ्ट कार्ड खरेदी करण्याचा पर्याय उत्तम असू शकतो. समोरच्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यानुसार आणि त्याच्या आवडीनुसार तो व्यक्ती खरेदी करु शकतो. तसेच या कार्डची व्हॅलिडीटी साधारणपणे वर्षभराची असते. त्यामुळे वर्षभरात लागेल तेव्हा कधीही खरेदी करता येऊ शकते.
५. परफ्यूम सेट़़
ही साधारणपणे मुलांच्या आवडीची गोष्ट आहे. मुलांना वेगवेगळ्या वेळेला बाहेर जाण्यासाठी चांगल्या वासाचे परफ्यूम आवडतात. तसेच ही दिर्घकाळ टिकणारी गोष्ट असल्याने त्या व्यक्तीच्या मनात तुमची आठवण बराच काळ राहू शकते. तुमचा भाऊ किंवा बॉयफ्रेंड तुमच्यापासून दूर असेल तर तुम्ही दिलेल्या परफ्यूमच्या वासासोबत ते आनंदी राहू शकतात. यामध्ये त्यांना आवडणारे वास किंवा सध्या मुलांमध्ये ज्याची फॅशन आहे अशा वासाच्या परफ्यूम किंवा डिओड्रंटची निवड तुम्ही करु शकता.
६. डिनर डेट
डिनर डेट हा गिफ्ट देण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय ठरु शकतो. तुमच्या भावाचे लग्न झाले असल्यास किंवा त्याला गर्लफ्रेंड आहे याचा तुम्हाला अंदाज असल्यास एका दगडात दोन पक्षी मारले जाऊ शकतात. शहरातील एखाद्या लॉन रेस्टॉरंट किंवा रुफ टॉप हॉटेलची यासाठी तुम्ही निवड करु शकता. त्यामुळे तुमचा भाऊ तुमच्यावर नक्कीच खूश होईल. आणि नवरा किंवा बॉयफ्रेंडला अशी डेट द्यायची असेल तर काय, मज्जाच तुम्हालाही त्यांच्यासोबत एक संध्याकाळ रोमँटीक पद्धतीने एन्जॉय करता येईल.
७. गॅजेटस
सध्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब या गोष्टी जवळपास जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत आल्या आहेत. ऑफीसचे काम असो किंवा अगदी किराणा आणि कपडे ऑर्डर करायचे असोत हातात मोबाईल असल्याशिवाय आपले काम पुढे जात नाही. अशावेळी हेडफोन, ब्लूटूथ, पॉवर बँक यांसारखी उपकरणे आवश्यकच असतात. त्यामुळे तुमच्या नवऱ्याची किंवा भावाची आताची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी नक्कीच खरेदी करु शकता.
८. पार्लर व्हाऊचर
केवळ मुलींनाच नटायला आवडते असे नाही. तर आपली स्कीन, दाढी, केस यांबाबत मुलंही खूप पझेसिव्ह असतात. हल्ली मुलांनाही पार्लरमध्ये कित्येक तास घालवायला आवडते. यामध्ये केवळ दाढी-कटींग नसते तर हेड मसाज, फेस मसाज यांसारख्या कित्येक गोष्टी मुलं आवडीनं करुन घेतात. चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी आणि कामाचा थकवा, शीण घालवण्यासाठी हे पार्लरींग केले जाते. अशाच एखाद्या पार्लरचे व्हाऊचर तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने नवरा, भाऊ किंवा बॉयफ्रेंडला नक्की देऊ शकता. त्यामुळे ऐन दिवाळीत ते फ्रेश होण्याचे कारण तुम्ही ठरु शकता.