पूर्वी राखीपौर्णिमा म्हटलं की भावाला लुटण्याचा, भावाकडून छान छान गिफ्ट घेण्याचा दिवस असं म्हटलं जायचं. मुलीने रक्षा कर म्हणून भावाला राखी बांधायची आणि भावाने रक्षा करण्याचं वचन देत तिला काही ना काही भेटवस्तू द्यायची. काळ बदलला तसं मुलीही कमवायला लागल्या. त्यामुळे भावाकडून गिफ्ट घेताना त्यालाही काहीतरी द्यायला हवे या भावनेतून आता बहिणीही भावांना गिफ्ट द्यायला लागल्या. मुलींना दागिने, पर्स, कपडे असे देण्यासाठी बरेच पर्याय असतात, पण मुलांना मात्र काय द्यायचे असा प्रश्न पडतो. यंदाच्या राखीपौर्णिमेला तुम्हालाही तुमच्या लाडक्या भावाला काही गिफ्ट द्यायचे असेल तर त्यासाठी काही सोपे पर्याय पाहूया (Rakhi Purnima Raksha Bandhan Gift Ideas for brothers)...
१. गिफ्ट कार्ड
हा सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणजे त्यांना जे काही हवे असेल त्याप्रमाणे ते खरेदी करु शकतात. एखाद्या मॉलचे किंवा ऑनलाइन शॉपिंग पोर्टलचे गिफ्ट कार्ड खरेदी केल्यास साधारण वर्षभराच्या कालावधीत आपण हव्या त्या गोष्टीची खरेदी करु शकतो.
२. डबा किंवा बाटली
ऑफीसला लागणाऱ्या या अतिशय गरजेच्या वस्तू असतात. या गोष्टी कितीही असल्या तरी आणखी लागतातच. एखादवेळी डबा किंवा बाटली ऑफीसमध्ये विसरली, हरवली तर आपल्याला नवीन लागतेच. त्यामुळे हे पर्याय उपयुक्त आणि चांगले ठरतात. ही गोष्ट रोजच्या वापरातली असल्याने भावाला तुमची रोज न चुकता आठवण येईल.
३. परफ्यूम
परफ्यूम ही बहुतांश मुलांच्या अतिशय आवडीची गोष्ट. घरातून बाहेर पडताना परफ्यूम मारला नाही असा एखादाच मुलगा असतो. ही अगदी रोज, दिवसातून किमान २ वेळा लागणारी गोष्ट असल्याने आपण भावाच्या आवडीचा किंवा सध्या फॅशन इन असलेला परफ्यूम त्याला नक्की देऊ शकतो.
४. शेविंग किट
ही मुलांच्या रोजच्या वापरण्यातली गोष्ट असते. ऑफीसला जाताना मुलं बहुतांश वेळा शेव्हींग करुनच बाहेर पडतात. हल्ली बाजारात ग्रुमिंग किटस म्हणून विविध कंपन्यांचे बरेच शेव्हींग किट उपलब्ध असतात. रोजच्या वापरातली गोष्ट असल्याने याचा चांगला उपयोग होतो.