राखीपौर्णिमा २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. बहिणीला काय द्यावं, काय दिलं तर ती जास्त खूश होईल असा विचार बहुतांशवेळा आपण करत असतो. पण नेहमी काय तेच तेच कपडे, दागिने, घरगुती वस्तू द्यायच्या असा विचार तुमच्याही मनात एव्हाना आला असेल. मग वेगळं बहिणीला आवडेल असं काय द्यावं असं काहीसं तुमच्या डोक्यात सुरू असेल तर आज आम्ही असेच काही हटके पर्याय तुम्हाला सुचवणार आहोत. हे गिफ्ट पर्याय नेहमीपेक्षा थोडे वेगळे असल्याने ते पाहून बहिणींनाही नक्कीच आनंद होईल. राखीपौर्णिमेची ओवाळणी म्हणजे बहिण-भावाच्या नात्यातील भावना असल्या तरी एकमेकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याचे ते एक सुंदर निमित्त असते. हेच निमित्त खास व्हावे यासाठी काही वेगळे गिफ्ट पर्याय पाहूया (Rakhipornima Raksha Bandhan Different Gift Idea’s 2022).
१. चित्रपट किंवा नाटकाचे तिकीट
आपली बहिण लग्न झालेली असली तर रोजच्या धबडग्यात ती इतकी अडकून जाते की संसार, नोकरी सगळं करताना तिला स्वत:साठी वेळ होतोच असे नाही. विकेंडला एखादा चित्रपट किंवा नाटक पाहायचे ठरवूनही ती कित्येकदा जाऊ शकत नाही. अशावेळी तिला आवडेल अशा एखाद्या चित्रपटाचे किंवा नाटकाचे तिकीट तुम्ही गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकता. बहिणीची साधारण आवड तुम्हाला माहित असल्याने त्याप्रमाणेच चांगल्या नाटकाची किंवा चित्रपटाची निवड करा. एखादा गाण्याचा, नृत्याचा किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम हाही याला उत्तम पर्याय असू शकतो.
२. पार्लर ट्रीटमेंट कूपन
सौंदर्य ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट असते. आपण कायम सुंदर दिसावे असे प्रत्येकीला वाटते. मात्र रोजच्या धावपळीत स्वत:कडे म्हणावे तसे लक्ष देता येतेच असे नाही. म्हणूनच आपल्या बहिणीला केसांच्या किंवा चेहऱ्याच्या एखाद्या ट्रीटमेंटसाठी चांगल्या पार्लरचे गिफ्ट कूपन तुम्ही आवर्जून देऊ शकतात. हल्ली अनेक पार्लर अशाप्रकारची ऑनलाइन गिफ्ट कूपन उपलब्ध करुन देतात. स्वत:साठी मुद्दाम वेळ काढून पार्लरमध्ये न जाणारी बहिण यामुळे पार्लरमध्ये जाईल आणि तुमच्यावरही खूश होईल.
३. योगा क्लास किंवा जिमचे सबस्क्रीप्शन
तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहार, व्यायाम, झोप आणि एकूणच जीवनशैली चांगली असणे आवश्यक असते. आपण अनेकदा व्यायामाला काही ना काही सबब देतो. अशावेळी जीम किंवा योगा क्लास लावला तर आपण त्याठिकाणी आवर्जून जातोच. आपल्या बहिणीचे साधारण रुटीन आपल्याला माहित असते त्याप्रमाणे तिच्या घराजवळ असणारा एखादा फिटनेस रिलेटेड क्लासचे सबस्क्रीप्शन दिल्यास तिची तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. यामध्ये झुंबा, डान्स, अॅरोबिक्स, स्विमिंग अशा कोणत्याही गोष्टींचा समावेश असू शकतो.
४. डीनर किंवा शॉर्ट ट्रीप बुकींग
रोज तेच ते काम करुन आपण सगळेच वैतागतो. अशावेळी आपल्याला मी टाइम हवा असतो. हा मी टाइम आपल्याला मिळतोच असे नाही. अशावेळी रोजच्या रुटीनमधून स्वत:साठी वेळ काढावा असे प्रत्येकीला वाटते. मात्र रोजच्या धावपळीत ही इच्छा काहीशी मागेच राहून जाते. अशावेळी आपण बहिणीला एखादी डीनर डेट, १ डे किंवा २ डे ट्रीपचे बुकींग दिल्यास तिला रोजच्या व्यापासून नक्कीच थोडा बदल मिळेल.