मे महिना म्हणजे लग्नसराई इतकंच नाही तर पुढे येऊ घातलेल्या सणावारांच्या निमित्ताने महिला बरीच खरेदी करतात. साड्यांची खरेदी करायला तर महिलांना निमित्तच हवे असते. सणवार, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा या ना त्या निमित्ताने साडी खरेदी ठरलेलीच असते. मग अमुक एक नवीन पॅटर्न आलाय, असा रंग आपण बरेच वर्षात घातला नाही. हिच्याकडे आहे तशी साडी मलाही हवी अशा एक ना अनेक गप्पा सुरू होतात. महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साडीसाठी महिला कितीही तास फिरु शकतात किंवा कितीही दुकानं पालथी घालू शकतात. मात्र असं होऊ नये म्हणून साडी खरेदी करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या...
१. पॅटर्न, बजेट आधीच नक्की करा
साडी खरेदीला जाताना आपल्याला साधारण कोणत्या प्रकारची साडी घ्यायची आहे हे निश्चित करा. त्यासाठी आपण बाहेर फिरतो तेव्हा विंडो शॉपिंग करुन ठेवा किंवा समारंभामध्ये एखादी साडी पाहिली असेल तर त्याचा पॅटर्न नीट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला साडी घेण्याच्या वेळेस आपल्याला नेमका हवा तो पॅटर्न दुकानदाराला सांगता येईल आणि मनाप्रमाणे साडी घेता येईल. याचप्रमाणे आपल्या बजेटची साधारण रेंज ठरवा आणि त्याच रेंजमध्ये साड्या दाखवायला सांगा. म्हणजे एखादी महागडी साडी आवडली पण बजेटमुळे ती घेता आली नाही अशी रुखरुख लागणार नाही.
२. रंगाच्या बाबतीत काळजी घ्या
आपल्याकडे साडीचे किंवा वेगवेगळ्या कपड्यांचे कोणते रंग जास्त प्रमाणात आहेत ते आधीच लक्षात ठेवा. म्हणजे साडी घेताना तो रंग प्रामुख्याने टाळला जाईल. आपल्याकडे जास्त प्रमाणात साड्या असतील तर अनेकदा आपल्याला नेमक्या साड्या आठवत नाहीत. यासाठी खरेदीसाठी निगताना आपल्या साड्यांवर एक नजर मारायला विसरु नका. दुकानामध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावलेले असतात. त्यामध्ये साडीचा रंग प्रत्यक्ष रंगापेक्षा वेगळा दिसण्याची शक्यता असते. अशावेळी दुकानाच्या बाहेर येऊन नैसर्गिक उजेडात साडी कशी दिसते ते बघा.
३. आपली ठेवण
आपली उंची, बांधा, रंग यांचा विचार करुन साडीची खरेदी करायली हवी. आपली उंची कमी असेल तर आपल्याला खूप मोठे काठ चांगले दिसणार नाहीत. तसेच आडव्या डिझाईनची, जास्त मोठ्या प्रिंटची साडी कमी उंचीच्या लोकांनी नेसणे टाळावे. मात्र तुम्ही उंच असाल तर तुम्ही सगळे प्रयोग करु शकता. तसेच आपल्या रंगाला साजेशी साडी घेणे केव्हाही उत्तम, त्यामुळे साडी फिकट पडली किंवा खूपच गडद वाटली असे होणार नाही.
४. साडीचा पोत
आपण एखाद्या लहानशा समारंभाच्यादृष्टीने साडी घेत असू तर ती हलकीफलकी, थोडी डिझायनरकडे झुकणारी असेल तरी चालते. पण आपण सणाला किंवा लग्नासाठी साडी घेत असू तर ती थोडी भरजरी आणि त्या विशिष्ट निमित्ताला सूट होईल अशी साडी घ्यायला हवी. साडी खरेदी करताना साडीचा पोत आवर्जून लक्षात घ्यावा. साडी जास्त जड किंवा कापड तलम नसेल तर ती साडी नेसल्यावर बोंगा होऊ शकते. त्यामुळे साडी खरेदी करताना साडीचा पोत बघणे महत्त्वाचे आहे.