दिवाळी म्हणता म्हणता सुरुही झाली. महिलांसाठी हा सण आनंदाचा असला तरी थोडा थकवणाराही असतो. घराची साफसफाई, दिवाळीचा फराळ, घराचा कोपरा न कोपरा सजवण्यासाठीची लगबग हे सगळे करता करता पार थकून जायला होते. यातही घरातील प्रत्येकासाठी काही ना काही खरेदी करण्याची यादी शेवटच्या दिवसापर्यंत संपत नाही. दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठीही बाजारात फिरुन प्रत्येकाच्या आवडीचे काही ना काही आपण आवर्जून घेतो. गिफ्ट मिळाल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून आपल्यालाही छान वाटते. असेच गिफ्ट आपण स्वत:लाही दिले तर? किती छान कल्पना आहे ना. इतरांनी आपल्याला दिलेल्या गिफ्टचा आनंद तर लुटूच. पण दिवाळीच्या निमित्ताने आपणही आपल्याला काही गिफ्ट देऊ शकतोच की. संसार किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके अडकून जातो की स्वत:साठी आपण फारच कमी वेळा वेळ, पैसा खर्च करतो. वर्षभर हे सगळे सुरु असतेच, सुरु राहणारही असते. पण यातूनच थोडा वेळ काढून स्वत:लाही खूश करा की. मग वाट कसली पाहताय सख्यांनो.. गिफ्ट युवरसेल्फ..आता यामध्ये तुम्ही स्वत:ला काय काय देऊ शकता पाहूया...
१. स्पा - दिवाळीची कामं करुन आणि वर्षभरही आपण शरीराने आणि मनाने बरेच थकतो. दिवाळीत नुकतीच थंडी सुरु झाल्याने आपल्या थोडे मॉइश्चराइज होण्याची गरज असते. अशावेळी तुम्ही स्वत:ला स्पाचे एखादे पॅकेज गिफ्ट करु शकता. हल्ली बऱ्याच पार्लरमध्ये किंवा स्पा सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पा उपलब्ध असतात. यामध्ये बॉडी स्पा, हेयर स्पा असे पर्यायही उपलब्ध असतात. कामाचा शीण, थकवा कमी होण्यासाठी याचा नक्की उपयोग होऊ शकतो आणि ऐन दिवाळीत तुम्ही एकदम फ्रेश आणि ताजेतवाने होऊन जाल. मात्र ज्याठिकाणचे पॅकेज घ्याल त्या सेंटरबाबत किंवा पार्लरबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच हे पॅकेज घ्या.
२. ट्रीप - सतत घरातील जबाबदाऱ्या सांभाळून आणि घरातल्या लोकांसोबत तुम्हीही कंटाळू शकता. तुम्हाला तुमची स्वत:ची अशी स्पेस हवी असू शकते. अशावेळी तुम्ही स्वत:ला एखादी छोटीशी टूर किंवा लॉंग ट्रीप गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकता. रोजच्या रुटीनपासून थोडा ब्रेक मिळाला तर तुम्हीही ताजेतवाने व्हाल आणि नव्या जोमाने पुन्हा कामाला लागू शकाल. ही ट्रीप तुम्ही चक्क एकट्या किंवा तुमच्या मैत्रीणींसोबत करु शकता. किंवा हल्ली बरेच जण लेडीज स्पेशल टूर नेतात, त्यांच्यासोबत जाण्याचा पर्यायही तुमच्याकडे असू शकतो, म्हणजे तुम्हाला ट्रीपचे कोणतेही नियोजन करावे लागत नाही. विशेष म्हणजे यावेळात घरची काळजी अजिबात करु नका.
३. सांगितीक मैफल - दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये प्रसिद्ध गायक, वादक, कवी यांच्या सांगितीक मैफिलींचे आयोजन केलेले असते. अशी एखादी मैफल तुम्ही स्वत:ला नक्की गिफ्ट देऊ शकता. त्यामुळे तुमची दिवाळी तर छान होईलच पण तुम्ही वेगळ्या वातावरणात गेल्याने तुम्हाला आतून नकळत फ्रेश वाटेल. दिवाळीत तुम्ही कुटुंबासोबत बिझी असाल तर दिवाळीनंतरही काही साहित्यिक कार्यक्रम, मैफीली, नाटक असेल तर त्याचे तिकीट तुम्ही स्वत:ला नक्की गिफ्ट देऊ शकता. कलेचा आस्वाद घेणे ही चांगल्या मूडसाठी एक थेरपी असू शकते.
४. क्लास - मला अमुक एक गोष्ट शिकायचीये असं आपण बऱ्याच दिवसांपासून म्हणत असतो. पण त्या गोष्टीचा क्लास लावायला काही आपल्याला जमलेला नसतो. दिवाळीच्या निमित्ताने अशा एखाद्या क्लाससाठी नोंदणी करुन टाका. दिवाळी झाली की तुम्ही या क्लासला जाऊ शकता. यामध्ये चित्रकला, पेंटींग, पॉटरी एखादे वाद्य किंवा गायन, नाटक, नृत्य अशा कोणत्याही गोष्टीचा क्लास असू शकतो. पण रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढून स्वत:साठी काहीतरी कराल तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच एनर्जी देणारी ठरु शकेल.
५. दागिने - आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात नातेवाइकांमधील कोणाचे किंवा मैत्रीणींमधील कोणाचे गळ्यातले तर कोणाचे हातातले पाहिलेले असते. असे आपणही घेऊ असे बऱ्याचदा आपण म्हणतो पण ती वेळ काही जुळून येत नाही. दिवाळीच्या निमित्ताने असा एखादा ज्वेलरी सेट किंवा हातात घालता येतील असे कडे तुम्ही नक्की स्वत:ला गिफ्ट देऊ शकता. यातही तुम्ही काठाच्या साड्या घालत असाल तर पारंपरिक मोत्याचा सेट किंवा कुंदनचा एखादा हेवी सेट तुम्ही विचार करुन घेऊ शकता.
६. आवडते खाद्यपदार्थ - आपल्याला आवडणाऱे पदार्थ आपल्या घरातील मंडळींना आवडतीलच असे नाही. कधी नवऱ्याची आवड तर कधी मुलांची आणि कधी सासू-सासऱ्यांची. ही आवड सांभाळताना आपली आवड कधी मागे पडते आपले आपल्यालाही कळत नाही. पण दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही तुम्हाला आवडणारे पदार्थ बाहेर जाऊन खाऊ शकता. किंवा घरी घेऊन येण्यासारखे असतील तर तुम्ही हे पदार्थ आणून तुमच्या सवडीने खाऊ शकता. यामध्ये अगदी केक, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचाही समावेश असू शकतो. त्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून तुमच्या आवडीचे पदार्थ स्वत:ला बिनधास्त गिफ्ट करा आणि मनसोक्त खा.