भारतीय आऊटफिटसमध्ये जेवढे प्रकार पाहायला मिळतात तेवढे जगातील इतर देशांत नसतात. भारताच्या प्रत्येक राज्यातील महिलांचा पारंपरिक पोषाख वेगळा असतो. अभिनेत्रीही त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे ड्रेस घालून आपले फोटोशूट करुन घेत असतात. मिस दिवा मिस युनिव्हर्स २०२१ ची विजेती हरनाझ संधू हिने नुकतेच पारंपरिक ड्रेस घालून एक फोटोशूट केले. यामध्ये तिने शॉर्ट कुर्ता आणि पायघोळ पँट कम लेहंगा घातल्याचे दिसत आहे. गुलाबी रंगाच्या या लेहंग्याचा पॅटर्नही अतिशय सुंदर असून हरनाझ त्यात उठून दिसत आहे. गुडघ्यापर्यंत घट्ट आणि त्याखाली लेहंग्याप्रमाणे घोळदार असलेला हा पॅटर्न तरुणींमध्ये सध्या इन आहे. य ड्रेसवर गोल्डन दोऱ्याने बारीक नक्षीकाम केलेले असून तिने यावर नेटची ओढणी घेतली आहे. मोठे कानातले, बोटात मोठी अंगठी, एका हातात मोठ्या बांगड्या आणि जुती यामुळे तिने परफेक्ट पारंपरिक लूक केल्याचे दिसते.
एका शेतात हरनाझने हे शूट केले असून गुलाबी रंगाच्या या आकर्षक अशा ड्रेसमध्ये चांगली उंची असलेली हरनाझ देखणी दिसत आहे. मुख्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील स्माइल आणि तिचा उत्साह यामुळे तिचा लूक आणखी खुलला आहे असे म्हणायला हरकत नाही. कधी हातात शेतातील एखादी काठी घेत तर कधी एखादे गवताचे पाते भिरकावत ती छान पोझ देत आहे. ग्रामीण महिलेप्रमाणे गवतात बसूनही तिने काही पोझ दिल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर तिचा हा लूक आणि ड्रेस यांची बरीच चर्चा होत आहे. त्यामुळे तुमची दिवाळी खरेदी आणखी बाकी असेल तर तुम्ही अशाप्रकारचा एखादा ड्रेस नक्की खरेदी करु शकता. त्यातही असा गुलाबी, लाल, केशरी यांसारखा गडद रंग असेल तर तो आखणी सुंदर दिसू शकेल.
हरनाझ ही मूळची पंजाबमधील चंदीगड येथील आहे. इस्रायल येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत हरनाझ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्सच्या डोक्यावर मुकुट घालेल. २१ वर्षीय हरनाझ मॉडेल असून ती नृत्य, पोहणे आणि घोडेस्वारी यामध्येही तरबेज आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडियो पोस्ट केले आहेत. त्याला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक केले असून अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी तिला पंजाबची शेरनी म्हणून संबोधले आहे.