Join us

शॉपिंग मॉल्समध्ये खिडक्या का नसतात, याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 3:00 PM

शॉपिंग मॉल्समध्ये एक खिडकीदेखील पाहायला मिळत नाही याचं कारण काय असू शकतं असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचच उत्तर जाणून घेऊया...

तुम्ही अनेक वेळा शॉपिंग मॉलमध्ये गेला असेल, कधी खरेदीसाठी, कधी फक्त मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शॉपिंग मॉलमध्ये खिडक्या का दिसत नाहीत? कोणत्याही इमारतीत बाहेरचं दृश्य पाहण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या ठेवल्या जातात. शॉपिंग मॉल्समध्ये एक खिडकीदेखील पाहायला मिळत नाही याचं कारण काय असू शकतं असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचच उत्तर जाणून घेऊया...

जेव्हा अमेरिकेत मॉल्सचा ट्रेंड सुरू झाला तेव्हा ते खिडक्यांशिवाय बांधण्याचा ट्रेंड सुरू झाला. या रचनेमागे एक खास कारण आहे. मॉलची रचना अशी आहे की तिथे वेळेचं भान राहत नाही आणि बाहेरचं दृश्य पाहता येत नसल्याने लोक वेळ विसरतात. आतला दिव्यांचा झगमगाट आणि गोष्टी पाहिल्यावर असं वाटतं की, दिवस आहे. पण प्रत्यक्षात संध्याकाळ असते. यामुळे लोक मॉलमध्ये अधिक वेळ घालवतात आणि अधिक खरेदी करतात.

खिडक्या नसण्यामागे 'ही' आहेत कारणं

वेळेचं भान नसणं - खिडक्या नसल्यामुळे नैसर्गिक प्रकाश नाही आणि बाहेरील जगाशी संपर्क नाही. त्यामुळे वेळेचं भान राहत नाही. त्यामुळे लोकांना आपण मॉलमध्ये किती वेळ घालवतो याचा अंदाज येत नाही.

लक्ष केंद्रित करणं - खिडक्यांमधून दिसणारं दृश्य ग्राहकांचं लक्ष विचलित करू शकतात. खिडक्या नसल्यामुळे खरेदीवर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं आणि ग्राहक अधिक खरेदी करण्यास प्रवृत्त होतात.

आकारमान - खिडक्या नसल्यामुळे मॉलचं नेमकं आकारमान समजत नाही. मॉल नेमका कुठे संपतो तेच कळत नाही. त्यामुळे ग्राहकांना असं वाटतं की, अजून बरंच काही पाहायचं बाकी राहिलं आहे.

तापमान नियंत्रण – खिडक्या नसल्यामुळे मॉलमधील तापमान, प्रकाश आणि आवाज सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. हे ग्राहकांना आरामदायक आणि आकर्षक वातावरण देण्यास मदत करतं.

जास्त दुकानं - खिडक्या नसल्यामुळे भिंतीचा जास्त वापर केला जाऊ शकतो. तसेच जास्त दुकानं आणि एग्जीबिशन स्टॉल्स उभारता येतात.

ऊर्जेची बचत - खिडक्या नसल्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो.

सुरक्षा - खिडक्या चोरांसाठी एंट्री पॉइंट बनू शकतात, पण खिडक्या नसल्यामुळे हा धोका टळतो आणि सुरक्षा वाढते.

टॅग्स :खरेदी