श्रुती साठे
नवीन, वेगवेगळ्या स्टाईल्स आणि ट्रेंडी कपडे घालण्यासाठी थंडीचे महिने अतिशय अनुकूल वाटतात. उन्हाळ्यातला जीव नकोसा करून टाकणारा उकाडा आणि पावसाळ्यातली चिकचिक यामुळे साहजिकच फॅशन थोडी बाजूला ठेऊन, सोयीच्या, सुटसुटीत आणि मेंटेनन्सला सोप्पे असणाऱ्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यातून लग्न समारंभ, ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी, ऑफिस मधून ब्रेक घेऊन लांब सहलीला जाणे असे सगळे उत्साहाचं वातावरण आपल्याला नवनवीन कपडे ट्राय करायची संधी देते आणि ती नक्कीच वाया जाऊ देऊ नये!
थंडीसाठी कपडे घेताना फॅब्रिक आणि रंग कसे निवडाल?
१. वेल्वेट - काही वर्ष पद्याआड गेलेलं वेल्वेट आता परत ट्रेंड मध्ये आलंय. वेल्वेटचं वैशिट्य म्हणजे या कापडात ब्राईट रंग खूप सुरेख दिसतात, त्याला एक वेगळीच ग्रेस येते. वेस्टर्न स्टाईल मध्ये टॉप्स, ड्रेसेस, लांब स्लिट चे कुर्ते, पँट्स असे पर्याय या कापड प्रकारात उठून दिसतात. लग्न समरंभासाठी वेल्वेट वर एम्ब्रॉयडरी केलेले लेहेंगा चोली, ब्लाऊज तसेच शाल सुरेख दिसतात.२. फर- कडाक्याच्या थंडी साठी फर जॅकेट उपयुक्त ठरतात. परंतु आपल्याकडील थंडीसाठी फरचा स्टोल आवश्यक तेवढी उब देऊन जातो.३. लोकर- ऍक्रिलिक पासून बनणाऱ्या लोकरीत रंग खूप उठावदार दिसतात. मशीनवर विणला जाणारा लोकरीचा तागा हा जास्त पातळ आणि रेखीव असतो. अर्थात आपल्याकडे परंपरागत चालत आलेले आई आणि आजीने विणलेला स्वेटर घालण्यात एक वेगळीच उब असते.४. पी यू लेदर- आवश्यक ती चमक आणि वापरण्यास योग्य असे फेक पी यू लेदर तरुणांचे लक्ष वेधून घऊ लागलंय. पी यू लेदर चे टॉप्स, जॅकेटस, ओव्हरकोट, पँट्स खूप ट्रेंडी दिसतात.५. डेनिम - वर्षानुवर्षे बाजारात मागणी असलेल्या डेनिम कापडाचा वापर आता जीन्स साठी मर्यादित न राहता, शर्ट टॉप्स, जॅकेट, ड्रेस, रॉम्पर अश्या स्टाईल्स मध्ये दिसू लागला आहे.६. रंग- ब्राईट रंग थंडी मध्ये खुलून दिसतात. लाल, निळ्या, काळ्या इत्यादी गडद रंगांचे कुर्ते, साड्या पार्टी साठी योग्य ठरतात. खास हिवाळ्यासाठी मेटॅलिक रंगामध्ये - मुख्यत्वेकरून सिल्वर रंगांच्या ड्रेसेस, टॉप्स कडे तरुण मुली आकर्षित होताना दिसतायत.७. ग्रे चेक्स- आता पर्यंत पुरुषांच्या पसंतीस पडणारे ग्रे आणि काळ्या रंगांमधले चेक्स आता महिलांच्या फॅशन रेंज मध्ये दिसून येतायत. यामध्ये जॅकेट, टॉप आणि लूज पॅन्ट महिलांच्या पसंतीस पडताना दिसू लागलेत.८. फ्लोरल डिझाईन- आत्तापर्यंत फ्लोरल प्रिंटेड टॉप्स आणि बॉटम्स यांना उन्हाळ्यात उठाव असायचा. परंतु यावेळी हिवाळ्यासाठी सुद्धा खूप ब्रॅण्ड्स नी फ्रेश तसेच डार्क फ्लोरल रेंज बाजारात आणली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. फ्लोरल प्रिंट ड्रेसेस, किंवा डार्क फ्लोरल टॉप आणि डेनिम जीन्स एका कॅज्युअल डे ट्रिप साठी शोभून दिसतात.
थंडीत नेमके कोणते कपडे घ्यावेत, जे उबदार असतील आणि स्टायलिशही?
१. थर्मल्स- थर्मल कॅमिसोल्स, टॅंक टॉप्स, तसेच लग्गीन्ग हे अतिशय उबदार असतात. बेसिक व्हाईट, ऑफव्हाईट, ग्रे रंगांचे थर्मल तुमच्याकडे असले कीत्यावर कोणताही आपला नेहमीचा टॉप, टी शर्ट वापरू शकतो. स्वतःला लोकरीच्या कपड्यात, शालीत गुंडाळून मिळणारी उब अगदी पातळ थर्मल्स देतात. वापरायला सोप्पे आणि सुटसुटीत असल्याने याला बाजारात खूपच जास्त मागणी आहे.२. बॉम्बर जॅकेट आणि ट्रेंच कोट- अतिथंडीच्या भागात बॉम्बर जॅकेट आणि ट्रेंच कोट खूप उपयोगी पडतात. बाजारात वेगवेगळ्या रंगात आणि आकर्षक प्रिंट मध्ये हे दोन्ही उपलबध आहेत.रिव्हर्सिबल- म्हणजेच दोन्ही बाजूनी वापरात येणारे बॉम्बर्स जास्त लक्ष वेधून घेतात.३. स्वेटर- वर्षानुवर्षे जी फॅशन कधीच मागे पडली नाही ती स्वेटरची! मात्र पूर्वी अगदी मळखाऊ गडद रंगात मिळणारे स्वेटर आता विविध स्टाईल्स मध्ये मिळू लागलेत. आता मात्र स्वेटरकडे फक्त गरज म्हणून न पाहता त्याची वीण आणि स्टाईल मध्ये खूप प्रयोग केलेले दिसून येतात. फ्रंट ओपन, पूल ओव्हर, टर्टल नेक, पॉन्चो, सेल्फ डिझाईन स्वेटर लक्ष वेधून घेतात. जास्त लांबीचे स्वेटर ड्रेसेस थंडी मध्येही ट्रेंडी राहण्यास मदत करतात.४. स्कार्फ आणि स्टोल- प्रिंटेड डार्क रंगांचे स्कार्फ थंडीत हवेहवेसे वाटतात आणि तुमचा लुक पूर्ण करण्यास उपयोगी ठरतात.
(लेखिका फॅशन एक्सपर्ट आहेत.)