Join us  

दिवाळीत नवीन वॉशिंग मशीन घ्यायचा प्लॅन आहे? मग माहित हव्यात 3 गोष्टी, खरेदी होईल सोपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 10:15 AM

Shopping Tips for Buying Washing Machine in Diwali : पाहूया मशीन घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा.

ठळक मुद्देटायमर नसेल तर मशीन झाल्याचे लक्षात न राहील्याने कपडे अनेकदा मशीनमध्येच राहू शकतात. तुम्ही नियमितपणे मशीनचा वापर करत असाल तर टॉप लोड वॉशिंग मशीन केव्हाही चांगली. 

वॉशिंग मशीन ही आता लक्झरी गोष्ट नसून ती गरजेची गोष्ट झाली आहे. घरोघरी कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीनमुळे महिलांचे दैनंदिन काम खूप सोपे झाले आहे. हल्ली घरोघरी वापरण्यात येणाऱ्या या मशिन्समध्ये बऱ्याच कंपन्या विविध तंत्रज्ञानाने युक्त अशा मशीन्स विकतात. ग्राहकही आपल्या गरजेनुसार मशीनची खरेदी करतो. पण अनेकदा तांत्रिक वस्तू खरेदी करताना आपल्याला काही साधे प्रश्न असतात. अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. काही मशिन्स अर्ध स्वयंचलित असतात तर काही पूर्ण स्वयंचलित असतात. यामध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यात प्रामुख्याने ट्विनवॉश, फ्लेक्सवॉश, इकोबबल, ओ २ वॉश आणि ड्रम टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. वॉशिंग मशीनमध्ये अगदी कमी वेळात कपडे धुतले जातात आणि तितक्याच सहजतेने वाळतातही. पाहूया मशीन घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा (Shopping Tips for Buying Washing Machine in Diwali) . 

(Image : Google)

टॉप लोड की फ्रंट लोड ? 

गेल्या काही वर्षात बाजारात फ्रंट लोड मशीन दाखल झाले आहेत. मात्र हे मशीन घरात वापरण्यासाठी खरंच उपयुक्त असतात का हा विचार करणे महत्त्वाचे आहे. घरात लहान मुले असतील तर फ्रंट लोड मशीन घेणे शक्यतो टाळावे. तसेच फ्रंट लोड मशीन वजनाने जास्त जड असते. त्यामुळे काही कारणाने ती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलवायची झाल्यास अवघड पडते. फ्रंट लोड मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे मशीनचा वापर करत असाल तर टॉप लोड वॉशिंग मशीन केव्हाही चांगली. 

किती किलो कपडे धुवायचे? 

आपल्या घरात किती लोक राहतात आणि किती प्रमाणात कपडे धुतले जातात यावरुन किती किलोचे मशीन घ्यायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. कुटुंबात जास्त व्यक्ती असतील आणि रोज भरपूर कपडे मशीनध्ये लावत असाल तर जास्त किलोचे मशीन घेतलेले चांगले. त्यामुळे मशीनच्या इंजिनावर लोड येत नाही. 

(Image : Google)

टायमर 

मशीनला टायमर असण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा असतो. तो म्हणजे मशीन लावून आपण इतर कामे करत असलो तरी मशीन पूर्ण झाल्यावर टायमर वाजल्याने आपल्या लक्षात येते आणि आपण कपडे वाळत घालू शकतो. टायमर नसेल तर मशीन झाल्याचे लक्षात न राहील्याने कपडे अनेकदा मशीनमध्येच राहू शकतात. 

टॅग्स :खरेदीदिवाळी 2022