उन्हाळा म्हटलं की नुसता घाम आणि चिकचिक. या काळात बाहेर पडायचे म्हटले की उकाड्यामुळे आपल्याला नको होऊन जाते. कारण सतत येणारा घाम आणि त्यामुळे मेकअपची आणि केसांची लागणारी वाट यामुळे आपण स्वत:ला चांगल्या पद्धतीने कॅरी करु शकत नाही. दिवस मोठा आहे म्हणून फिरायला जायचे तरी डोक्यावर तळपते ऊन असल्याने आपण बाहेर जायचे टाळतो. पण हा उन्हाळाही (Summer Special ) आपल्यासाठी सुसह्य आणि तितकाच फॅशनेबल होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सजगपणे खरेदी करण्याची आणि आपले कपडे आणि इतर गोष्टी निवडण्याची गरज आहे. पाहूयात उन्हाळा कूल आणि फॅशनेबल (Fashion In summer) होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
१. स्कार्फ निवडताना
उन्हात घराबाहेर पडताना स्कार्फ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. तळपत्या उन्हात डोक्याला चटका लागू नये यासाठी आपण बहुतांश जण स्कार्फ वापरतो. हा स्कार्फ कॉटनचा आणि फिकट रंगाचा असायला हवा हे आपल्य़ाला माहित असते. पण याचवेळी हा स्कार्फ थोडा ट्रेंडी असेल तर आपण त्यातही फॅशनेबल दिसू शकतो. डोकं झआकलं जाईल हे बघत असतानाच स्कार्फचा रंग, त्यावरील डिझाइन, तो कॅरी करण्याची फॅशन याबाबत आपण सजग राहिलो तर स्कार्फ हा फक्त गरजेपुरता न राहता ती फॅशन बनू शकेल.
२. टोपी आणि गॉगल घालून दिसा कूल
हल्ली आपल्यातील बहुतांश महिला स्वत:च्या गाडीवर प्रवास करतात. भर उन्हात गाडीवर प्रवास करताना डोळ्याला आणि डोक्याला चटके बसतात. अशावेळी स्कार्फच्या ऐवजी आपण एखादी ट्रेंडी टोपीही नक्की कॅरी करु शकतो. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, फॅशनच्या टोप्या सहज मिळतात. मुले ज्याप्रमाणे डोक्याला उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून टोपी घालतात तशी आपणही टोपी वापरु शकतो. इतकेच नाही तर डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आपण गॉगल आवर्जून वापरतो. सध्या वेगवेगळ्या आकारांचे, रंगाचे असे फॅशनेबल गॉगल बाजारात उपलब्ध असून डोळ्यांचे संरक्षण करण्याबरोबरच आपण फॅशनेबल राहण्यासाठी या गॉगलचा नक्की उपयोग करु शकतो.
३. कपड्यांची निवड करा हटके
थंडीच्या दिवसांत आणि पावसाळ्यातही आपण अंगभर कपडे घालतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला थोडे हटके आणि फॅशनेबल राहता येऊ शकते. उकाडा असल्याने गुडघ्यापर्यंतचे वन पीस, शॉर्ट स्कर्ट, केप्री किंवा इतरही काही फॅशन्स आपण नक्की करु शकतो. थंडीत आणि पावसाळ्यात थंड हवा असल्याने आपण स्लिव्हलेस किंवा स्ट्रीपचे कपडे घालू शकत नाही. पण उन्हाळ्यात मात्र आपण या सगळ्या फॅशन्स नक्की करु शकतो. सध्या सुती कपड्यांत पण बरेच प्रकार, डिझाईन्स पाहायला मिळतात. त्यामुळे कपड्यांच्याबाबतीतही तुम्ही उन्हाळ्यात फॅशनेबल राहू शकता.