कांदे, लसूण, बटाटे आणि टोमॅटो या अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू. यापैकी कांदा आणि लसूण हे तर रोजच लागतात. कांदा, लसूण आणि टोमॅटोशिवाय अनेक जणींचा रोजचा स्वयंपाक होतच नाही.. आता टोमॅटो लवकर खराब होतात, त्यामुळे ते ताजे ताजे घेऊन लगचेच संपवले जातात. पण लसूण, बटाटे आणि कांदे या गोष्टी मात्र साठवण्याच्या दृष्टीने घेतल्या जातात. लसूण वर टांगून ठेवला की तो कित्येक दिवस चांगला राहतो. पण कांद्याची साठवणूक करताना मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणून घेतलेला कांदा खूप दिवस टिकावा यासाठी कांदा खरेदी (purchasing of onion) करताना आणि तो साठवून ठेवताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.
कांदा विकत घेताना या काही गोष्टींची काळजी घ्या...१. जो कांदा थोडासा ओलसर दिसेल किंवा हाताला थोडा ओला लागेल, असा कांदा घेऊ नका.२. ज्या कांद्याचे वरचे टरफल एकदम कोरडे आणि हात लावताच मोकळे होणारे असेल, असा कांदा साठविण्याच्या दृष्टीने चांगला असतो.३. कांदा घेताना जर त्यातून थोडा जरी वास येत असेल, तर तो कांदा घेऊ नका. कारण तो आतून काळा असण्याची किंवा लवकरच सडण्याची शक्यता असते. ४. कांद्याचे देठ आवर्जून तपासून बघा. जर देठाला थोडा मऊपणा दिसला किंवा हिरवे कोंब आलेले दिसले तर तो कांदा साठविण्याच्या दृष्टीने घेऊ नका. लगेचच वापरायचा असेल तर घेऊ शकता.
५. आकाराने खूप छोटे कांदे साठविण्यासाठी घेऊ नका. कारण अशा लहान कांद्यांना लगेचच कोंब फुटतो. म्हणून कांदे साठविण्यासाठी घेणार असाल तर ते मध्यम आकाराचेच घ्या. ६. वरच्या बाजूने काळपट गुलाबी दिसणारा कांदा आतून खराब असण्याची, काळा, सडका निघण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वरच्या बाजूने गुलाबी, फ्रेश रंग असणारेच कांदे घ्या.
कांदा कसा साठवायचा.. (how to store onion for long)- खरेदी करून आणलेला कांदा जास्त दिवस टिकावा, असं वाटत असेल तर त्याची साठवणूक योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. - कांदा नेहमी एखाद्या जाळीच्या टोपल्यास साठवून ठेवा. भांडे धुतल्यानंतर ते ठेवण्यासाठी जी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची जाळी वापरली जाते, तशा पद्धतीचे जाळीदार टोपले कांदा साठवण्यासाठी वापरा.- यामुळे कांद्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत. - या जाळीदार टोपल्यात सगळ्यात खाली वर्तमानपत्र अंथरा आणि त्यावर कांदे ठेवा.- कांदा खूप उन्हात किंवा खूप दमट, ओलसर भागात ठेवू नका. दमट भागात त्याला कोंब येतात तर खूप उन्हात ठेवल्यास कांदा सुकून जातो.