थंडी सुरु झाली, सगळीकडे जॅकेट्सच्या जाहिराती दिसू लागल्या. ऑनलाइन आणि ऑफलाइन अवतीभोवतीही आपणजणी पाहतो, ज्या सुंदर जॅकेट्स घालतात. आणि आपल्याला कळत नाही की, यांना एवढे सुंदर जॅकेट्स कुठून मिळतात? आपल्याला कसे सापडत नाहीत. तर तुम्ही यंदा जॅकेट्स खरेदी करणार असाल तर हे काही प्रकार ऑनलाइन शॉपिंग करतानाही सर्च करा आणि लोकल मार्केटमध्येही.काय घ्यायचं आणि नेमका ट्रेण्ड काय हे माहिती असेल तर मग हवी ती गोष्टही शोधणं सोपं जाईल. अर्थात आपली गरज काय, आपण ते जॅकेट्स घालून नेमके कुठं जाणार हे मात्र नक्की लक्षात घ्या आणि मग त्याप्रमाणे खरेदी करा.
पफर जॅकेट
पफर जॅकेट तुम्हाला यंग, स्पोर्टी लूक तर देतोच शिवाय हिवाळ्यात एक खास मेकओव्हरही करतो. बेज, बेबी पिंक, मिलिटरी कलर, ब्लॅक हे रंग पफर जॅकेटसाठी सर्वात बेस्ट पर्याय ठरतात. जीन्स, कुर्तीज, साडी, स्कर्ट अशा कुठल्याही पेहरावावर ते सहज फिट होतात. लाँग आणि शॉर्ट पॅॅटर्न अशा दोनही प्रकारामध्ये हे पफर जॅकेट छान वाटतात. फॉक्स फर किंवा फेक फरची कॉलर तसेच कफ असलेले पफर ट्रेंडी लूकमध्ये आणखी भर घालतात. क्रॉप्ड पफर जॅॅकेट हा प्रकार देखील यंगस्टर्समध्ये भाव खाऊन आहे.
हुडी जॅकेट
बिनधास्त हुडी घ्या. ती कायम फॅशनेबलच असते. प्लेन, विथ लेटरिंग तसेच प्रिंटेड हुडी जॅकेट्स मस्त दिसतात. पिवळा, गुलाबी, मरुन, राखाडी रंगात अधिक पसंत केले जातात. या जॅकेटला कॅप देखील अटॅच्ड असल्यामुळे वेगळा स्कार्फ बांधायची गरज भासत नाही. स्वेट शर्ट्समधील हा प्रकार सर्वच वयोगटासाठी उत्तम पर्याय.
रॅप कोट
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अंगारखा कोट. हा प्रकार डॅशिंग तसेच कॉन्फिडंट लूक देतो. रॅप कोट म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडे वळवून नंतर बटन्स अथवा बेल्ट लावले जातात. त्याचा लूक रॅप केल्यासारखा दिसतो. अंगारखा कुर्ता/कुर्ती असते तसेच हा रॅप कोट. उंचीला जास्त असणारा हा रॅप कोट डेनिम्सवर क्लासिक लूक देतो.
बॉम्बर
विंटर फॅशनचा ऑल राऊंडर म्हणून हा प्रकार ओळखला जातो. कारण जशी तुमची आवश्यकता असते, तसे बॉम्बर जॅकेट कॅरी करता येते. कॅज्युअल लूक हवा असेल तर स्निकर्स, जॉगर्सवर तुम्ही ते घालू शकता. एलिगंट लूक हवा असेल तर जीन्स, शर्टवर तुम्ही घालू शकता.
चेक्स कोट
चौकडीचे डिझाईन आणि नी लेंथ असा या कोटचा लूक असतो. फॉर्मल लूकसाठी याशिवाय दुसरा कोणता पर्याय असूच शकत नाही. प्लेन टॉपवर फिकट राखाडी रंगात हा कोट घातला तर आणखी बेस्ट. तसेच फॉर्मल लूक नको असेल तर पिवळा, केशरी अशा ब्राईट रंगाच्या टॉपवर कोट कॅरी करा, जोडीला स्निकर्स विसरु नका.
जम्पर
हायनेक, बोटनेक, व्ही नेकचे लाँग पॅटर्नचे हे जम्पर स्वेटर्स लाईम व पॅरट ग्रीन रंगांमध्ये सुंदर दिसतात.. हे जम्पर्स जीन्स, स्कर्ट्सवरही कमालीचे सुंदर वाटतात.