लग्नात आदल्या दिवशी, हळदीला किंवा विधींना नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ठसकेबाज नऊवारी नेसत आणि पारंपरिक दागिने घालून तरुणी आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण सेलिब्रेट करतात. आपली संस्कृती जपण्यासाठी किंवा काहीतरी वेगळे म्हणून नऊवारी साडी नेसली जात असली तरी त्यात आपण उठून दिसायला हवे ना. मराठमोळ्या फॅशनमध्ये उठून दिसण्यासाठी नऊवारी साडी खरेदी करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. नाहीतर ऐनवेळी आपली फजिती होऊ शकते. आपल्याला सहावारी साडीबाबत अनेकदा माहिती असते, पण साडीचा नेमका पोत, रंग, साईज, काठ यांबाबत पुरेशी माहिती नसते. हल्ली नऊवारी नेसणाऱ्या आजी लोकांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्यामुळे नऊवारी खरेदी करताना योग्य ती माहिती असलेली केव्हाही चांगली.
सहावारी साडीमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तो प्रकार, पाहिजे त्या रंगात अगदी सहज उपलब्ध होतो, त्याप्रमाणे नऊवारी साडीत आपल्याला हवा तो पॅटर्न आपल्याला परवडेल अशा बजेटमध्ये मिळेलच असे नाही. मग त्यासाठी दुकानच्या दुकानं पालथी घातली जातात. इतके करुनही आपल्याला हवा तो पॅटर्न मिळेलच असे नाही. आता तुम्ही स्वत:च्या लग्नासाठी किंवा इतर एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी नऊवारीची खरेदी करणार असाल तर खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.
नऊवारीचा पोत – सहावारी साड्या ज्याप्रमाणे रेशमी तलम प्रकारात येतात, त्याप्रमाणे नऊवारी साड्याही उपलब्ध असतात. पण लग्नाच्या विधींसाठी साडी खरेदी करत असाल तर ती फार तलम प्रकारातील नको, कारण त्यामुळे ती अंगावरुन सतत सरकण्याची भिती असते. कितीही पिनअप केले तरी साडी जास्त रेशमी असल्यास ती सावरणे विधी करताना कठीण होऊ शकते. यामध्ये तुम्ही पारंपरिक नारायणपेठी, कांजीवरम, पैठणी, इरकल असे प्रकार नक्की ट्राय करु शकता.
रंग निवडताना – तुम्ही स्वत:च्या लग्नासाठी नऊवारी साडी घेत असाल तर त्याचा रंग शक्यतो तुमच्या रंगाला मॅच होईल असा असायला हवा. लग्नसमारंभात जास्त लोक असल्यामुळे आणि फोटोसाठीही गडद रंग उठून दिसतात. नऊवारीमध्ये लाल, गुलाबी, राणीकलर, जांभळा, हिरवा, केशरी असे गडद रंग उठून दिसतात. त्याप्रमाणे साडीची खरेदी करा.
साडीचा काठ – साधारणपणे आपण लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने घालतो. तेव्हा साडीचा काठ खूप मोठा असेल तर हे दागिने झाकले जाऊ शकतात. त्यामुळे साडीचा काठ आपल्या उंचीला शोभेल असा आणि लहान असेल तेवढा चांगला. त्यामुळे आपण घातलेले दागिने शोभन दिसतात. तसेच साडीचा काठ त्याच रंगाचा असण्यापेक्षा कॉन्ट्रास्ट रंगाचा असेल तर आपण जास्त उठून दिसू शकतो. त्यामुळे साडी खरेदी करताना याचा नक्की विचार करा.
साडीची लांबी- रुंदी – नऊवारी साडी खरेदी करताना ती खरंच नऊवार आहे की नाही हे तपासून घ्या. अनेकदा वार कमी असल्यास साडी नेसताना ती पुरत नाही आणि मग ऐनवेळी आपला गोंधळ उडू शकतो. तसेच साडीची रुंदीही आपल्या उंचीप्रमाणे योग्य आहे की नाही तपासा.
साडी नेसण्याची पद्धत – नऊवारी नेसण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. ब्राह्मणी ओचा काढून नेसायची पद्धत, शेतात काम करणाऱ्या बायकांप्रमाणे कुणबी पद्धत, डाव्या मांडीवर निऱ्यांची झिगझॅग झालर येईल अशारितीने, लोककला सादर करताना नेसतात तशी काष्ट्याची साडी तर कोळी बायका नेसतात तशी अर्धी नऊवारी साडी आणि वरच्या बाजुला ओढणी असे बरेच प्रकार असतात.
साडी शिवून घेणार की नेसून – तुम्ही लग्नात साडी शिवून घेणार की नेसवून हे आधी नक्की करा. साडी शिवून घेणार असाल तर त्याप्रमाणे आपल्या मापानुसार साडी शिवून मिळते. तुम्हाला हवी तशी तुम्ही ही साडी शिवून घेऊ शकता. अशा साडीत वावरणे सोपे वाटत असले तरी एकदा साडी शिवली की नंतर त्याचे काहीच करता येत नाही. त्यामुळे हल्ली बरेच जण साडी नेसण्याला प्राधान्य देताना दिसतात. साडी ज्यांच्याकडून नेसून घेणार असाल, त्यांच्यासोबत आधी ट्रायल करा. म्हणजे साडीची उंची आणि इतर गोष्टी योग्य आहेत की नाही याचा अंदाज येणे सोपे जाईल.