Join us  

साडी नेसायला आवडते, पण पोत कळत नाही? साडीचे फॅब्रिक कसे ओळखाल, हे माहीत हवंच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 11:26 AM

साडी खरेदी करताना त्याबद्दल थोडी बेसिक माहिती असेल तर खरेदी करणे सोपे नाही का होणारे...

ठळक मुद्देसाडी खरेदी करताना त्याच्या कापडाबद्दल माहिती असायला हवीसणावाराला स्वत:साठी किंवा भेट म्हणून साडी घेत असाल तर, नक्की वाचा साडीत आपण खुलून दिसायला हवे त्याबरोबरच कम्फर्टेबल पण वाटायला हवे ना...

दसऱ्यानंतर आता आपल्या सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळी म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपडे खरेदी. स्त्रियांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणीच. त्यातही साडी हा महिलावर्गाचा वीक पॉईंट. पण साडी खरेदी करताना त्याबाबत थोडी माहिती असायला हवी. साडीचे कापड नेमके कसे ओळखायचे, कोणते कापड कोणत्या वेळी चांगले दिसेल. आपल्याला कम्फर्टेबल असलेले कापड कोणते हे समजण्यासाठी कापडाच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती असणे गरजेचे आहे. यातही दिवाळीचे चार दिवस आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावे, स्टायलिश दिसावे असे सगळ्यांनाच वाटते. अशावेळी आपल्याला आवडतील, सूट होतील असे कपडे असले की आपण कितीही वेळ अगदी सहज वावरु शकतो. सध्या बाजारात साड्यांचे असंख्य प्रकार आले असून त्याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. चला तर मग तुम्ही स्वत:साठी, आई, बायको, बहिण, मुलगी, मैत्रीण अशा कोणासाठीही साडी खरेदी करत असाल तर साडीच्या या प्रकारांबद्दल माहिती घेणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरु शकते....

कॉटन 

कॉटन हा पारंपरिक आणि अतिशय कम्फर्टेबल असा कापडाचा प्रकार आहे. वजनाने हलकी असणारी ही साडी सणावाराच्या दिवसांत वावरायला सोपी. दिवाळीच्या दिवसांत थंडी असल्याने थोडे जाड कॉटन तुम्ही घेऊ शकता. सध्या कॉटनमध्येही अनेक प्रकार पाहायला मिळत असून अशाप्रकारची साडी नेसल्यावर रॉयल लूक येतो. या प्रकारच्या साड्या कुठेही सहज उपलब्ध होतात. कॉटनची साडी चापून-चोपून बसत असल्याने तुम्ही एकदा साडी नेसली की पुन्हा तुम्हाला त्याकडे पाहावे लागत नाही. 

(Image : Unsplash)

सिल्क 

सिल्क हा भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कापडाचा प्रकार आहे. यातही असंख्य प्रकार पाहायला मिळतात. सिल्क वजनाने हलके असल्याने त्यात आरामदायी वाटते. महिलांना साधारणपणे सिल्कच्या साड्या आवडतात कारण तलम सिल्क अंगाला छान बसते आणि त्याचा लूकही खूप छान दिसतो. सिल्कच्या कापडाला एक प्रकारची चमक असल्याने सणावाराला या प्रकारच्या साड्या प्रामुख्याने नेसल्या जातात. सिल्कच्या साडीवर कोणत्याही प्रकारचे दागिने छान दिसत असल्याने तुम्हाला त्या बाबतीतही फारसा विचार करावा लागत नाही. बाजारात सिल्क प्रकारातील साड्याही अगदी सहज भरपूर प्रकारांत पाहायला मिळतात. 

बनारसी 

भारतात बनारसी कापडाचा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. अनेक महिला या कापडाला पसंती देतात कारण त्याचे प्रकार आणि त्यावरील कारागिरी अतिशय सुंदर पद्धतीने केलेली असते. बनारसमधील हे कापड केवळ तिथेच नाही तर देशाच्या इतर भागातही प्रसिद्ध आहे. बनारसी सिल्कमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या, इंडो-वेस्टर्न आउटफीट घातले जातात. चांगले बनारसी कापड काही प्रमाणात महाग असते. मात्र त्यातही बरेच प्रकार असल्याने कमी किमतीतील कापड तुम्हाला मिळू शकते. 

(Image : Pixabay)

लिनन 

लिनन वजनाने अतिशय हलके असल्याने सणावाराला तुम्हाला चांगले कपडे घालून घरातील काम करावे लागणार असेल तर हा उत्तम पर्याय आहे. लिननमध्ये सध्या बाजारात अनेक प्रकार पाहायला मिळतात. या साड्या फॉर्मल आणि कॅज्युअल वेअर म्हणून छान दिसत असल्याने तुम्ही सणाच्या निमित्ताने अशाप्रकारची साडी घेऊन नंतर वर्षभर वेगवेगळ्या कारणांसाठी ही साडी आवर्जून वापरु शकता. 

तसर

हा सिल्कमधील एक प्रकार असून यामध्ये अतिशय सुंदर नाजूक नक्षीकाम केलेल्या सा़ड्या मिळतात. तसर सिल्क अंगावर चोपून बसत असल्याने तुम्हाला बारीक दिसायचे असल्यास ही साडी तुम्ही नक्की घेऊ शकता. या कापडाची शाईन खूपच छान असल्याने सणावाराला एखाद्या गडद रंगाची तसर सिल्क साडी नेसली तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसता. 

 

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सदिवाळी