Join us  

नातेवाईक-मित्रमंडळींकडे बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना प्रसाद म्हणून काय न्यायचे? ५ हेल्दी पर्याय.. स्विट्सपेक्षा वेगळं काही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 10:32 AM

Ganpati Festival Options for Sweets and Mithai : बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना मोदक, पेढे यांना ५ हेल्दी पर्याय...

ठळक मुद्देगोड खाऊन कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या वेळी खायला चांगला पर्याय म्हणून काही तिखट देऊ शकताराजगिरा, खजूर, दाणे यांचे पदार्थ प्रसाद म्हणून आणि खाऊ म्हणूनही उत्तम पर्याय आहेत.

गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे नातेवाईकांनी, प्रियजन-मित्रमंडळींनी एकत्र येण्याचे, एकमेकांच्या भेटीगाठीचे निमित्त. अशावेळी बाप्पासाठी आणि घरातल्या लहानग्यांसाठी आपण आवर्जून काहीतरी खाऊ, प्रसाद घेऊन जातो. आता गणपती किंवा गौरीला कोणाकडे जाणार म्हटल्यावर आपण गोड काहीतरी न्यायला हवं असा आपला समज असतो. मग पेढे, बर्फी, मोदक असं काही ना काही घेतलं जातं. मात्र कोणाकडे जाताना नेहमी गोड काहीतरी घेण्यापेक्षा वेगळे काही पर्याय असू शकतात का याचा आवर्जून विचार व्हायला हवा. गोड खाल्ल्यामुळे लहान मुलांना अनेकदा दातांच्या समस्या निर्माण होतात. गोडामुळे लहान मुलं हायपर अॅक्टीव्ह होतात. इतकंच नाही तर सध्या अनेकांना डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या तक्रारींमुळे गोडावर नियंत्रण करायचे असते. मात्र अशात आपण गोड काही नेले की ते खाल्ले जाते. त्यापेक्षा हेल्दी आणि थोडे वेगळे असे कोणते पदार्थ आपल्याला दुसऱ्यांकडे जाताना नेता येऊ शकतात याविषयी (Ganpati Festival Options for Sweets and Mithai)...

(Image : Google)

१. फळं

फळं हा केव्हाही अतिशय हेल्दी आणि सगळ्यांना चालणारा पर्याय असतो. आरोग्यासाठी उपयुक्त असलेली फळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येतात. त्यामुळे प्रसाद म्हणून आपण फळं नक्की नेऊ शकतो. 

२. खजूर किंवा खजूराची बर्फी

खव्याची किंवा इतर कोणती बर्फी नेण्यापेक्षा खजूराची बर्फी किंवा अगदी नुसता खजूर नेला तरी चालतो. खजूरामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्याने सगळ्यांसाठीच हा पर्याय उत्तम ठरतो. उपवासाला किंवा जाता येता कधीही खजूराच्या २ बिया तोंडात टाकल्या तर एनर्जी आल्यासारखे होते. 

३. दाण्याचे लाडू किंवा चिक्की

दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. बाप्पाला साधारणपणे गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवत असल्याने दाण्याची चिक्की किंवा लाडू हा उत्तम पर्याय ठरु शकतो. एक लाडू खाल्ला की आपल्याला एनर्जी आल्यासारखे होते. हे लाडू घरी करणेही अगदी सोपे असतात किंवा हल्ली बाजारातही चांगल्या प्रतीचे लाडू किंवा चिक्की सहज मिळतात. 

(Image : Google)

४. राजगिरा लाडू किंवा वडी

राजगिरा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. यामध्ये गूळ असल्याने ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठीही हा चांगला पर्याय ठरु शकतो. हे कुरकुरीत असल्याने खायलाही छान लागते. पोटासाठी हलका असल्याने पचायला चांगला असतो. यामध्ये गुडदाणी, गुलकंद असे बरेच प्रकार मिळतात. 

५. भडंग किंवा पोह्याचा चिवडा

गोड काही न्यायचे नसेल आणि तिखट पर्याय हवा असेल तर भडंग किंवा पोह्याचा चिवडा हा चांगला पर्याय आहे. बाप्पाला नैवेद्यासाठीही हा चिवडा आपण ठेवू शकतो तसेच घरातील सगळ्यांना गोड खाऊन कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या वेळी खायलाही हा पर्याय चांगला असतो. 

 

टॅग्स :खरेदीअन्नआरोग्यगणपतीगणेशोत्सव