महिला दिन (Women’s Day) म्हटलं की महिलांचा जागर आणि कौतुक करण्याचा महत्त्वाचा दिवस. जगभरात ८ मार्च हा दिवस महिलांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी साजरा केला जातो. हल्ली आपण घरापेक्षा जास्त वेळ ऑफीसमध्ये असतो. त्यामुळे हे आपले दुसरे घरच असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ऑफीसमधील मित्रमंडळींबरोबरच आपण सणवार, आपल्या आयुष्यातील सुखदु:खे आणि असे काही खास दिवस शेअर करत असतो. मग अशा दिवसाचे औचित्य साधत आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलांना या निमित्ताने काहीतरी गिफ्ट देऊ (Gift Ideas) असा विचारही आपण करतो. आपली मैत्रीचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी आणि खास दिवसाचे सेलिब्रेशन म्हणून आपण एकमेकांना भेटवस्तू देऊन हे दिवस स्पेशल बनवतो. आता महिलांना आवडेल आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असे कोणते गिफ्ट देता येईल याविषयी....
१. कप किंवा ग्लास
ऑफीसमध्ये डेस्कवर काम करत असताना आपल्याला अनेकदा चहा, कॉफी किंवा अगदी ग्रीन टी पिण्यासाठी कपाची आवश्यकता असते. सतत थर्माकोलचे किंवा प्लास्टीकचे कप वापरण्यापेक्षा काचेचा किंवा स्टीलचा किंवा चिनी मातीचा एखादा छानसा कप आपल्या डेस्कवर असेल तर दिसायलाही छान दिसते. बाजारात सध्या अगदी ५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत अतिशय छान असे डिझायनर कप तुम्ही आपल्या ऑफीसमधील महिला कर्मचाऱ्यांना देऊ शकता. याबरोबरच सध्या झाकण असलेले छान आकाराचे ग्लासही बाजारात मिळतात.
२. पेन आणि डायरी
ऑफीसच्या कामासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन आणि डायरी. ही गोष्ट अशी आहे की ती कधीही वाया जात नाही आणि आवश्यकच असते. त्यामुळे तुम्ही छान नाव लिहीलेली किंवा प्रत्येकीचा फोटो असलेली एखादी छानशी डायरी आपल्या महिला सहकाऱ्यांना नक्की भेट देऊ शकता.
३. चॉकलेट
महिला वर्गातील बहुतांश जणींना आवडणारी गोष्ट म्हणजे चॉकलेट. चॉकलेट महिलांना केवळ खायलाच आवडत नाही तर कोणीतरी आपल्याला चॉकलेट दिले या कल्पनेनेही त्या मनोमन खूश होतात. त्यामुळे तुम्ही छानसे चॉकलेट आपल्या महिला कर्मचाऱ्यांना नक्की देऊ शकता.
४. डेस्क प्लांट
सध्या बाजारात अनेक प्रकारची रोपे मिळतात. यामध्ये प्रत्यक्ष बागेत लावायची रोपे, किचनमध्ये लावायची रोपे आणि शोभेची ऑफीसच्या डेस्कवर ठेवता येतील अशी रोपे यांचा समावेश असतो. तुम्ही आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलांना असे एखादे छानसे रोप महिला दिनाच्या निमित्ताने देऊ शकता. त्यामुळे त्यांच्या डेस्कची आणि पर्यायाने ऑफीसची शोभाही वाढण्यास मदत होईल. १०० ते ३०० रुपयांच्या रेंजमध्ये ही रोपे मिळतात.
५. पाऊच
पाऊच ही महिलांना नेहमी लागणारी गोष्ट. कधी लिपस्टीक, काजळ, आयलायनर, कंगवा यांसारख्या वस्तू ठेवण्यासाठी तर कधी कानातले ठेवण्यासाठी. इतकेच नाही तर कधी पेन, पेन्सिल यांसारख्या स्टेशनरीच्या गोष्टी ठेवण्यासाठी तर कधी पैसे ठेवण्यासाठी पाऊचची आवश्यकता असते. सध्या बाजारात खणापासून ते हँड एम्ब्रॉडरी केलेले असे अनेक पाऊच सहज मिळतात. यांची किंमतही ५० रुपयांपासून ते १५० ते २०० रुपयांपर्यंत असते.