Join us  

Women’s Day 2022 : Women's day celebration ideas महिला दिनाला स्वतःच द्या स्वतः ला छानसे सरप्राईज, 5 'स्पेशल' गिफ्ट्स तुम्हीच द्या स्वतःलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 5:34 PM

Women’s Day 2022 : Women's day celebration ideas कुटुंबातील, ऑफीसमधील, नात्यांतील, समाजातील विविध पातळ्यांवर लढत असताना आपण स्वत:साठीही कधीतरी जगायला हवं ना. मग द्या की तुम्ही स्वत:लाच एखादं छानसं गिफ्ट...हे घ्या गिफ्टचे हटके पर्याय

ठळक मुद्दे दुसऱ्या कोणी आपल्याला काहीतरी देईल याची वाट न पाहता आपणच आपल्याला एखादं छानसं गिप्ट दिलं तर? आपण स्वत:साठी काहीतरी घेणे पुरते विसरुन जातो. महिला दिनाचे औचित्य साधत स्वत:साठी छानसे गिफ्ट घ्या.

जागतिक महिला दिवस (Women’s Day) म्हणजे महिलांचा उदो उदो करायचा दिवस. या एका दिवशी महिलांचं जितकं कौतुक होतं तितकं वर्षभर आपल्या कृतीतून आणि वागण्यातून झालं तर या दिवसाला खरा अर्थ आहे. महिला दिन म्हणजे काहीतरी खास आणि आपल्याला या दिवशी आपल्या आजुबाजूच्या पुरुषांनी काही ना काही गिफ्ट द्यावे अशी स्वाभाविक अपेक्षा आपल्यातील अनेकींची असते (Women’s Day Celebration). मग ते एखादे फूल असो किंवा चॉकलेट. पण आपले कौतुक झालेले प्रत्येकच महिलेला आवडते. असे असले तरी दुसऱ्या कोणी आपल्याला काहीतरी देईल याची वाट न पाहता आपणच आपल्याला एखादं छानसं गिप्ट दिलं तर? स्त्री म्हणून जगताना आपण ज्याप्रमाणे असंख्य जबाबदाऱ्या पेलत असतो, कुटुंबातील, ऑफीसमधील, नात्यांतील, समाजातील विविध पातळ्यांवर लढत असताना आपण स्वत:साठीही कधीतरी जगायला हवं ना. मग द्या की तुम्ही स्वत:लाच एखादं छानसं गिफ्ट...हे घ्या गिफ्टचे हटके पर्याय (Gift Ideas)

(Image : Google)

१. स्वत:ला वेळ द्या

वेळ ही आपण स्वत:ला दिलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट असू शकते. एरवी रोजच्या रुटीनमध्ये आपण सतत धावत असतो. घरकाम, ऑफीस, प्रवास, स्वयंपाक, बाहेरची कामे या सगळ्या गदारोळात आपण स्वत:ला वेळ द्यायला विसरतो. कित्येकदा आपल्याला स्वत:साठी काहीतरी करायचे असते पण सगळ्या पातळ्यांवर लढताना ते शक्य नसते. अशावेळी महिला दिनाचे औचित्य साधत तुम्ही स्वत:साठी वेळ देऊ शकता.

२. स्वत:लाच ट्रीट द्या

अनेकदा आपण घरात वेगवेगळे पदार्थ करतो पण त्यात कोणाला काय आवडेल हाच विचार जास्त असतो. बाहेर गेल्यावरही प्रत्येकाच्या आवडीचे घेताना आपली आवड मागे राहून जाते. पण महिला दिनाच्या दिवशी तुम्ही तुम्हाला आवडणारी डिश आवर्जून ऑर्डर करा. इतकेच नाही तर हॉटेलमध्ये जाऊन छान तुमच्या आवडते खा. स्वत:साठी छानसा केक, चॉकलेट खरेदी करा आणि सगळाच्या सगळा तुम्ही एकट्याने खा.

३. छंद जोपासा 

रोजच्या रहाटगाडग्यात आपण इतके अडकून गेलेलो असतो की कोणे एकेकाळी आपल्यात एखादी कला होती हेही आपल्याला आठवेनासे होते. पण महिला दिनाचे औचित्य साधून एखादा गाण्याचा, नृत्याचा, चित्रकलेचा, वाद्याचा एखाद्या खेळाचाही क्लास लावायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही नियमितपणे फ्रेश राहायला मदत होईल. रोजच्या रोज जाणे जमणार नसेल तरी वीकेंडच्या दिवसाचेही काही क्लासेसे असतात ते आवर्जून लावा.

(Image : Google)

४. फिरायला जा

आपण रोज त्याच त्या घराला, ऑफीसला आणि लोकांना कंटाळतो आणि मग आपली नकळत चिडचिड व्हायला लागते. आपल्याला रुटीनमधून एखादा ब्रेक हवा असतो. तर बिनधास्त काही दिवसांची सुट्टी काढून एखाद्या टूरला जाऊन या. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर तुम्ही आतून फ्रेश व्हायला मदत होईल. हल्ली लेडीज स्पेशल टूर्सचे आयोजन करणाऱ्या कंपन्या असतात त्यांच्याकडून तुम्ही नियोजन करुन घेऊ शकता. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या मैत्रीणींसोबत ४ ते ५ दिवसांसाठी नक्कीच कुठेतरी फिरायला जाऊ शकता. यातले काहीच शक्य नसेल तर ठरवून आठवड्यातील २ ते ३ दिवस जवळच्या एखाद्या टेकडीवर, बागेत फिरुन या. 

५. घ्या स्वत:साठीच गिफ्ट 

घरातील खर्च, कर्ज, मुलांचे खर्च असे सगळे भागवताना आपल्या सगळ्यांचीच दमछाक होत असते. अशात आपण स्वत:साठी काहीतरी घेणे पुरते विसरुन जातो. पण आपल्याला कपडे, दागिने, पर्स, साडी, घड्याळ, गॉगल असे काही ना काही घेतले की मस्त वाटते. तेव्हा महिला दिनाचे औचित्य साधत स्वत:साठी छानसे गिफ्ट घ्या.

 

टॅग्स :जागतिक महिला दिनमहिलागिफ्ट आयडिया