किचन, त्यातही किचन ओटा आणि सिंक ही स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरली जाणारी जागा. हे सिंक वेळच्या वेळी साफ केले नाही तर तिथे एकतर पाणी तुंबते. जास्त काळ हे पाणी तुंबून राहीले तर याठिकाणी कुबट वासही यायला लागतो. त्यामुळे होणाऱ्या माश्या, चिलटं, झुरळं, मुंग्या यांमुळे किचनमध्ये आणखी घाण होते. एकदा हे सगळं खराब व्हायला किंवा तुंबायला लागलं की मग आपल्याला अगदी नको नको व्हायला लागतं.
जेवण तयार करण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणी नकोसे वास येतात, जे आरोग्यासाठीही चांगले नसतात. असे होऊ नये म्हणून आपण कधी याठिकाणी ड्रेनेज क्लीन करणारी एखादी पावडर घालतो किंवा तारा घालून पाईपलाईन क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंक स्वच्छ राहावे आणि याठिकाणी पाणी तुंबू नयेत यासाठी आज आपण १ सोपी ट्रिक पाहणार आहोत. ही ट्रीक करण्यासाठी कोणत्या वस्तू वापराव्यात आणि ती ट्रिक कशी करायची पाहूया (1 Easy Trick or Solution to Clean Drain System in Kitchen Sink)...
१. सिंकच्या ड्रेनमध्ये १ चमचा डीश सोप घालायचा.
२. त्यावर अर्धा कप बेकींग सोडा घालायचा.
३. त्यावर २ कप व्हिनेगर घालायचे.
४. त्यानंतर यावर एक नॅपकीन घालून १० मिनीटांसाठी झाकून ठेवायचे.
५. नंतर हा नॅपकीन काढून त्यावर २ ग्लास गरम पाणी घालायचे.
६. यामुळे ड्रेनेज पाईपमध्ये अडकलेली सगळी घाण निघून जाण्यास मदत होते.
अनेकदा सिंकच्या ड्रेनमध्ये चहाची पावडर, अन्नाचे खरकटे कण, भाजीपाल्याचे कण, माती असे काही ना काही अडकते. केवळ सिंकच्या इथल्या होलमध्येच हे सगळे अडकते असे काही नाही तर खाली पाईपमध्येही हा सगळा कचरा अडकून राहतो. यात चुकून केस किंवा आणखी काही गेले तर हा पाईप आणि पूर्ण पाईपलाईन चोकअप होते. मग पाणी आणि सगळे खरकटे अडकायला लागते. असे होऊ नये त्यासाठी हा उपाय करुन पाहायला हवा. साधारण महिन्यातून एकदा हा उपाय केल्यास ही पाईपलाईन क्लिन राहण्यास मदत होते आणि चोकअप होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते.