Join us  

नळांवर पाण्याचे पांढरट डाग पडले? १ सोपा उपाय, नळ दिसतील नव्यासारखे, चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2023 7:16 PM

1 Easy Trick To Clean Bathroom Taps : घरात सहज उपलब्ध असलेले सामान वापरुन काही मिनीटांत नळ होतील चकाचक

आपलं घर कायम स्वच्छ आणि चकचकीत असावं असं आपल्याला वाटतं. पण कितीही साफसफाई केली तरी काही ना काही खराब होतच असतं. आपण दिवसभर सिंकमधील, बेसिनमधील आणि बाथरुममधील नळांचा वापर करत असतो. पण हे नळ पाण्याने किंवा साबणामुळे पांढरट पडतात किंवा गंजतात हे आपल्या डोक्यातच येत नाही. बोअरींगचे किंवा जड, मचूळ पाणी असेल तर हे डाग जास्त प्रमाणात पडतात. ते साध्या पाण्याने जात नाहीत आणि त्यामुळे काही दिवसांपूर्वी चकचकीत दिसणारे हे स्टीलचे नळ अचानक खराब दिसायला लागतात (1 Easy Trick To Clean Bathroom Taps). 

जुने आणि मळकट झालेले हे नळ स्वच्छ कसे करावेत असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. मग कधी आपण साबणाने तर कधी घासणीने घासून हे नळ साफ करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तेवढ्यापुरते चकाकतात आणि पुन्हा तसेच पांढरट दिसायला लागतात. पण नळांवरचे हे पांढरट डाग कायमसाठी घालवायचे असतील तर त्यासाठी एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासूनच हा उपाय करायचा असल्याने यासाठी फारसा वेळही लागत नाही आणि स्वच्छताही मनासारखी होते. पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा. 

१. साधारण १ कप व्हिनेगर, १ कप पाणी आणि २ चमचे डीश वॉश लिक्विड एका बाटलीत एकत्र करायचे. 

२. स्प्रे बॉटलमध्ये एकत्र केलेले हे लिक्विड पांढरट पडलेल्या किंवा खराब झालेल्या नळांवर सगळ्या बाजूने फवारायचे. 

३. साधारण १० मिनीटे हे नळांवर तसेच राहू द्यायचे.

४. नंतर स्क्रबरने हे नळ स्वच्छ घासायचे आणि कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचे.

५. यामुळे नळावरचे डाग निघून जाण्यास मदत होईल आणि नळ नव्यासारखे चकचकीत दिसण्यास मदत होईल.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया