कोथिंबीर, पुदीना, कडीपत्ता यांसारखे मसाल्याचे पदार्थ असोत किंवा मेथीसारखी पालेभाजी असो. ही भाजी बाजारातून आणली की अगदी २ दिवसांत वाळून जाते. कधी ती कोरडी झाल्याने सुकते तर कधी पिवळी पडते. अशी पिवळी किंवा सुकलेली भाजी वापरायला नको वाटते म्हणून ती टाकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे भाजी तर वाया जातेच पण पैसे देऊन आणल्याने ते पैसेही वाया जातात. आपल्याला सतत बाजारात जाऊन भाजी आणणे शक्य नसते. त्यामुळे आपण एकदा गेलो की किमान ८ दिवसांची भाजी आणून ठेवतो. कोथिंबीर, कडीपत्त्यासारख्या गोष्टी तर आपण सगळ्याच पदार्थांवर थोड्या थोड्या करुन वापरत असतो (1 Easy Trick to keep herbs and leafy vegetables fresh) .
हे मसाल्याचे पदार्थ वाळून जाऊ नयेत आणि आहेत तसेच ताजेतवाने राहावेत यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण अगदी फ्रिजमध्ये प्लास्टीकच्या पिशवीत हे पदार्थ ओलसर होतात तर मोकळे ठेवल्यावर वाळून जातात. म्हणूनच आज आपण एक अतिशय सोपी आणि भन्नाट अशी ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे या पालेभाज्यांची देठं ओलसर राहतील आणि त्यांना मॉईश्चर मिळाल्याने या भाज्या ८ दिवस टिकण्यास मदत होईल. पाहूयात ही ट्रिक नेमकी कशी करायची आणि त्याचा कसा उपयोग होतो.
१. आपल्या घरात लहान-मोठ्या आकाराच्या काचेच्या बरण्या असतात त्यातील एक लहान आणि एक मोठी बरणी घ्यायची.
२. कोथिंबीर किंवा पुदीना, मेथी यांची एकदम खालची माती असलेली देठं काढायची पण खूप देठं न काढता थोडी देठं तशीच ठेवायची.
३. पानांच्या बाजुने ही भाजी मोठ्या बरणीत भरायची म्हणजे देठं बरणीच्या तोंडाशी राहतील.
४. यानंतर एका लहान आकाराच्या बरणीत पाणी भरुन ती बरणी या मोठ्या भरणीत घालायची आणि देठं या लहान बरणीतील पाण्यात येतील असे पाहायचे.
५. त्यानंतर मोठ्या बरणीचे झाकण लावून टाकायचे आणि झाकणावरच बरणी ठेवायची.
६. देठं पाण्यात राहील्याने बरणीतील कोथिंबीर, मेथी चांगली राहण्यास नक्कीच मदत होईल.