तुमच्यात मुळातच जिद्द आणि काहीतरी नवं करण्याची आस असेल तर तुम्हाला कोणीच कधी थांबवू शकत नाही. मग त्या आजुबाजूच्या व्यक्ती, परिस्थिती किंवा तुमचं स्वत:चं वाढतं वय. स्वप्न पाहिली की ती पूर्ण करण्याचं बळ आपोआप येतं हे नुकतंच एका उदाहरणातून दिसून आले. तब्बल १०४ वर्षे वय असणाऱ्या एका आजीने स्काय डायव्हिंगचे रेकॉर्ड मोडत हे सिद्ध करुन दाखवले. शिकागोमध्ये राहणाऱ्या या आजीबाईंनी वयाच्या या टप्प्यावर स्काय डायव्हिंग करत एक आश्चर्यकारक असा रेकॉर्ड केला आहे. ज्या वयात तब्येतीच्या तक्रारी करत दिवस काढले जातात त्या वयात या आजीबाई करत असलेल्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे (104 years old women skydives and break earlier World Record) .
२०२२ मध्ये स्विडनमधील लिनिया इंगेगार्ड लार्सन या १०३ वर्षीय महिलेने स्काय डायव्हिंग करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्ड आता हॉफनर दोरथी या १०४ वर्षीय महिलेने मोडले आहे. वय हा केवळ आकडा असतो असे म्हणणाऱ्या दोरथी वॉकर घेऊन स्काय डायव्हिंग सेंटरपाशी आल्या होत्या. त्यांना याठिकाणी केवळ काही जिने चढण्यासाठी मदत केली गेली, मात्र त्यानंतरचे डायव्हिंग त्यांनी अतिशय उत्तमपद्धतीने केले असे कंपनीकडून सांगण्यात आले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वयाच्या १०० व्या वर्षी स्काय डायव्हिंग केले असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना विमानातून ढकलावे लागले होते.
मात्र आता स्काय डायव्हिंग करताना त्यांनी १३,५०० फूटांवरुन उडी मारण्याकडे लक्ष दिले. आकाशातून इतक्या उंचीवरुन खाली येताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण न दिसता त्या अतिशय आनंदी दिसत आहेत. इतकी धाडसी खेळ पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरील स्माईलवरुन दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आजीबाईंच्या धाडसाचे नेटीझन्सनी भरपूर कौतुक केले आहे. या वयात त्यांच्यातील उत्साह खरंचच थक्क करणारा आहे हे नक्की. स्कायडाईव्ह शिकागो या कंपनीकडून हे आयोजन करण्यात आल्याने नेटीझन्सनी या महिलेची काळजी घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.