आई ही लहान मुलांसाठी सर्वस्व असते असे म्हटले जाते. आई आपल्या मुलांना त्यांच्या फायद्यासाठीच शिस्त लावते, चांगल्या सवयी लावते. आपल्या मुलांने कुठे चुकू नये किंवा मागे पडू नये यासाठी आईची सतत धडपड चालू असते. पण अनेकदा आईच्या सूचनांना किंवा काही गोष्टींना मुलं वैतागतात आणि मग ते त्रागा करतात. कधी वडील येण्याची वाट पाहतात आणि ते आले की आईची त्यांच्याकडे तक्रार करतात. इतकेच नाही तर घरात आजी आजोबा असतील तर त्यांच्याकडेही आईची तक्रार केली जाते. मात्र एका मुलाने आपल्या आईची तक्रार करण्यासाठी काय केले हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर चीनमधील ११ वर्षाचा मुलगा आईची आजीकडे तक्रार करण्यासाठी निघाला. विशेष म्हणजे यासाठी त्याने तब्बल २४ तास सायकल चालवली (11 Year old Boy Cycles 24 Hours to Complain his Mother).
आजी दुसरीकडे राहत असल्याने या मुलाला आपण सायकलवर तिच्याकडे जाऊ शकतो ही कल्पना सुचली आणि तो निघाला. मात्र यासाठी त्याने थोडेथोडके नाही तर १३० किलोमीटर अंतर पार केले. एक्सप्रेस वे वर आढळलेला हा मुलगा खूप जास्त थकला होता आणि रस्ता चुकल्यासारखा वाटत होता. उपस्थितांनी या मुलाबाबत संबंधित यंत्रणेला कळवले. तेव्हा त्यांनी मुलाच्या आईवडीलांना संपर्क केला. काही कारणावरुन आईशी वाद झाल्यावर हा मुलगा तडक झेजियांगमध्ये राहणाऱ्या आपल्या आजीकडे जाण्यासाठी निघाला. प्रवासात भूक लागेल म्हणून त्याने घरातून सोबत रोटी आणि पाणी आणले होते.
रस्ता शोधण्यासाठी त्याने रस्त्यावर लावलेल्या इंडीकेटर्सचा वापर केला. तरीही बरेचदा तो रस्ता चुकला पण पुन्हा तो योग्य रस्त्यावर आला. सोशल मीडियावर ही गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. वाद सुरू असताना रागात मुलाने आपल्याला आजीकडे जाण्याची धमकी दिली होती. मात्र काही वेळात तो शांत होईल असे वाटले होते, पण तो सायकल घेऊन निघून गेला असे या मुलाच्या आईने सांगितले. पण रात्रीच्या अंधारात किंवा रस्ता माहित नसताना अशाप्रकारे धाडस करणाऱ्या या मुलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर काही जणांनी दिली.