Join us  

आजीबाईने दिलं वाढदिवसाचं गिफ्ट आणि १८ वर्षांचा तरुण झाला कोट्यधीश, सिनेमापेक्षा मोठा ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 12:11 PM

18 year old US teen wins 8 crore from lottery ticket given by grandmother as a birthday Gift : कदाचित या आजीलाही आपलं आणि आपल्या नातवाचं नशीब एका रात्रीत पालटेल अशी कल्पना नसावी.

आजी म्हणजे आपल्या मनातला हळवा कोपरा असतो. लहानपणापासून आपल्याला मायेनं सांभाळणारी, आवडीचे पदार्थ खाऊ घालणारी आणि डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवणारी आजी प्रत्येकासाठीच खास असते. आजीने दिलेली कोणतीही गोष्ट आपल्यासाठी कायमच खूप खास असते. मग अगदी ती एक पापी असो किंवा एखादं वाढदिवसाचं गिफ्ट. आपण आजीने दिलेली प्रत्येक गोष्ट वर्षानुवर्ष अतिशय जपून ठेवतो. एका आजीने आपल्या नातवाच्या १८ व्या वाढदिवसासाठी एक लॉटरीचे तिकिट खरेदी केली आणि त्याला गिफ्ट म्हणून दिले. लॉटरी म्हटल्यावर ती लागेल किंवा नाही हे सगळे नशीबावर अवलंबून असल्याने त्याचे काय होईल याबाबत त्यांना उत्सुकता होती. पण या दोघांचेही नशीब एका रात्रीत फळफळले आणि १ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ८ कोटी रुपयांची ही लॉटरी या आजीने म्हणजेच तिच्या नातवाने जिंकली (18 year old US teen wins 8 crore from lottery ticket given by grandmother as a birthday Gift). एका रात्रीत अचानक आपण करोडपती होऊ ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट या किशोरवयीन मुलाच्या बाबतीत सत्यात घडली आहे. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या कालेब हेंग या मुलासोबत ही गोष्ट घडली आहे. कदाचित या आजीलाही आपलं आणि आपल्या नातवाचं नशीब एका रात्रीत पालटेल अशी कल्पना नसावी. कॅलिफोर्नियातील टरलॉक येथील ओअॅसिस मार्केट येथून या आजीने स्क्रॅच करायचे हे लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते. कालेब याचे आयुष्य़ातील हे पहिलेच लॉटरी तिकीट होते आणि आजीने गिफ्ट दिल्यामुळे ते जास्तच खास होते. हेंग याने कॅलिफोर्निया लॉटरीला दिलेल्या मुलाखतीत हे तिकीट जिंकण्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मी काहीसा शॉकमध्ये आहे, अशाप्रकारे मी लॉटरीचे तिकीट जिंकेन असे मला अजिबात अपेक्षित नव्हते. अचानकपणे मिलियन डॉलरची ही लॉटरी मला लागली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी आणि माझी आई आम्ही बाहेर चाललो होतो त्यावेळी मी सहजच हे तिकीट स्क्रॅच केले. बाहेर असल्याने माझ्याकडे माझे ओळखीचे प्रमाणपत्रही नव्हते. पण तिकीट लागले हे समजल्यानंतर आम्ही तसेच घरी गेलो लॉटरी क्लेम करण्यासाठी आयडेंटीटी कार्ड घेऊन आलो. आता इतक्या जास्त प्रमाणात मिळालेल्या पैशाचे हा १८ वर्षाचा मुलगा काय करणार असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. तर हेंग याने कॅलिफोर्निया लॉटरीमध्ये बोलताना सांगितले की हे पैसे आपण आपल्या कॉलेज शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी राखून ठेवणार आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरल