Join us  

टेबल, ओट्यावर ठेवलेल्या फळांवर सतत चिलटं, माश्या बसतात? २ सोपे उपाय, चिलटं होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 3:25 PM

2 Easy remedies to get Rid from Fruit Flies : चिलटं असंख्य किटाणू घेऊन वावरत असतात, जे आरोग्यासाठीही घातक असते.

थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या उपलब्ध असतात. विशेष म्हणजे या काळात फळं आणि भाजीपाल्याची किंमतही तुलनेने कमी असते. म्हणूनच आपण या काळात भरपूर फळं आणतो. एकावेळी अर्धा ते एक किलो फळं आणली तरी घरात कमी लोक असतील तर ही फळं लगेचच संपत नाहीत. अशावेळी आपण एखाद्या टोपलीत किंवा कुंड्यात ही फळं हवा लागेल अशा ठिकाणी ठेवतो. काहीवेळा ही फळं थोडी जास्त पिकतात. अशी पिकलेली फळं डायनिंग टेबल किंवा किचन ओट्यावर फळं ठेवली की त्यावर खूप माश्या आणि चिलटं घोंगावतात (2 Easy remedies to get Rid from Fruit Flies). 

फळांवर बसलेल्या माश्या आणि चिलटं पाहिली की आपल्याला ती फळं खाण्याची इच्छा होत नाही. अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बसून आलेल्या या माश्या किंवा चिलटं असंख्य किटाणू घेऊन वावरत असतात, जे आरोग्यासाठीही घातक असते. बरेचदा फळं कापडाने किंवा ताटलीने झाकून ठेवली तरीही ही चिलटं येतातच.पण फळांवर सतत अशी चिलटं बसू नयेत यासाठी दिप्ती कपूर २ सोपे उपाय सांगतात, हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

(Image : Google)

१. चिलटं बसत असलेल्या फळांच्या टोपलीत वाईन कॉर्क (वाईनच्या बाटलीवर असणारे एकप्रकारचे बूच) ठेवायला हवेत. यांचा वास काहीसा उग्र असल्याने चिलटं किंवा माश्या फळांपासून नक्कीच दूर राहण्यास मदत होते. साधारण २ वाईन कॉर्क टोपलीत फळांसोबत ठेवल्यास चिलटं याठिकाणी अजिबात फिरकत नाहीत. 

२. वाईन कॉर्क आपल्या घरात असतीलच असं नाही. अशावेळी करता येईल असा आणखी एक सोपा उपाय म्हणजे व्हाईट व्हिनेगरचा वापर. एका वाटीत व्हाईट व्हिनेगर घ्यायचे. त्यामध्ये कापड बुडवून ते ओले करायचे आणि फळं ठेवलेला बाऊल किंवा टोपलीच्या बाजुने हे ओले कापड फिरवायचे. व्हाईट व्हिनेगरही थोडे उग्र असल्याने चिलटं आणि माश्या फळांपासून दूर राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स