आपलं घर स्वच्छ असावं असं आपल्याला कायम वाटतं. पण त्याचबरोबर घरातील टॉयलेट आणि बाथरुमही स्वच्छ असावं अशी आपली इच्छा असते. त्यासाठी आपण नियमितपणे बाथरुम आणि टॉयलेट घासतोही. त्याच्या खालच्या आणि कडेच्या टाइल्स साफ होतात. मात्र याठिकाणी असणारा सगळा कचरा बाथरुमच्या पाईपमध्ये जातो आणि काहीवेळा अडकून बसण्याचीही शक्यता असते. यामध्ये इतर गोष्टींबरोबरच सर्वात जास्त समस्या असते ती केसांची. केस धुतले की गळणारे केस हे बाथरुमच्या जाळीवर अडकतात आणि वेळीच ते उचलले गेले नाहीत तर ते अडकून बसतात (2 Easy Tricks of Bathroom Drain Cleaning ).
केसांचे गुंते एकदा या ड्रेनेज पाईमध्ये अडकून बसले की ते साचत जातात आणि पाईप चोकअप होऊन जातो. हे गुंते काढण्यासाठी आणि पाईपलाईन साफ करण्यासाी मग आपल्याला प्लंबरला बोलवून किंवा अन्य काही उपाय करुन ती साफ करावी लागते. मात्र तरीही हे गुंते फार आतमध्ये अडकले असतील तर संपूर्ण सोसायटीची पाईप लाईनही काही वेळा चोकअप होण्याची शक्यता असते. सतत प्लंबरला बोलवणं आणि पैसे देऊन हे काम करुन घेणं तितकं सोपं नसतं. अशावेळी हे केस अडकू नयेत आणि पाईपलाईन सहज साफ करता यावी यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत.
१. केमिकल ड्रेन क्लिनर
बाथरुममधील पाईप साफ करण्याचा सर्वात उपयुक्त मार्ग म्हणजे केमिकल ड्रेन क्लिनर वापरणे हा आहे. बाजारात विविध प्रकारचे ड्रेन क्लिनर मिळतात, ज्याची वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. या क्लिनरचे काम हेच असते की पाईपमध्ये किंवा नळीमध्ये अडकलेले केस वितळवणे. अशाप्रकारे क्लिनरचा वापर करुन हे केस वितळवता येत असतील तर काम झटपट आणि सोपे होते.
ड्रेन क्लिनर कधी वापरु नयेत?
आपले पाईप मातीपासून तयार केलेले आणि अतिशय जुने असतील तर असे क्लिनर वापरु नयेत. लोखंडाच्या १० वर्षांहून जास्त पाईप्ससाठी हे क्लिनर उपयोगाचे नाहीत. बाथरुमच्या पाईपला वॉटर लिकेज असल्यास आणि या केमिकलच्या वासाचा त्रास होत असेल तर हे क्लिनर अजिबात वापरु नयेत. अनेकदा हे क्लिनर जास्त रासायनिक असल्याने पाईप फुटणे, खराब होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्याचा वापर अतिशय सावकाश करायला हवा. तसेच ड्रेन क्लिनर खरेदी करताना कमीत कमी केमिकल्स असलेले ड्रेन क्लिनर खरेदी करायला हवेत.
२. बेकींग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर
- सगळ्यात आधी जाम झालेल्या नळीमध्ये थोडा लिक्विड सोप टाकायचा. पावडरपेक्षा भांड्याचा लिक्विड सोप सगळ्यात चांगला.
- त्यानंतर १ कप व्हाइट व्हिनेगर नळीमध्ये घालून अर्धा मिनीटाने १ कप बेकींग सोडा यात घालायचा.
- ५ ते १० मिनीटे वाट पाहून त्यानंतर या नळीमध्ये गरम पाणी घालू शकता, त्यामुळे केमिकल रिअॅक्शननंतर नळीमध्ये जमा झालेले केस निघून जाण्यास मदत होईल.
- यानंतरही केस अडकलेले असतील तर प्लंजरचा वापर करुन ते काढायला हवेत. या सगळ्या स्टेप्स करुनही सुरुवातीला लगेच सगळे केस निघतीलच असे नाही. मात्र साधारण २-३ वेळा हा उपाय केल्यानंतर केस निघायला मदत होईल.