Join us  

ऐकावे ते नवलच, २८५ वर्षे जुन्या लिंबाचा झाला लाखांमध्ये लिलाव, ‘हे’ लिंबू नेमके आहे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 4:31 PM

285 year old lemon sold in lakhs in British auction : पाहा काय आहे या लिंबाची खासियत, इतक्या वर्षांनीही राहीले आहे तसे...

लिंबू ही आपल्या आहारातील एक महत्त्वाची गोष्ट. व्हीटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत म्हणून आपण आहारात लिंबाचा आवर्जून समावेश करतो. लिंबू बाजारातून आणले की आपण साधारणपणे आठवडाभरात ते वापरुन टाकतो. पण चुकून ते राहीले तर ते सुकून जाते आणि काळे पडायला लागते. अशा जुन्या झालेल्या लिंबाची चवही उतरते त्यामुळे काहीवेळा वाळलेले लिंबू आपण न वापरता फेकून देतो. एखाद महिना लिंबू अशाप्रकारे राहणे आणि वाळून जाणे ठिक आहे. पण एक लिंबू तब्बल २८५ वर्ष तसेच राहीले. विशेष म्हणजे इतक्या वर्षांच्या या लिंबाचा लिलाव झाला आणि त्याला लाखांमध्ये किंमत मिळाली (285 year old lemon sold in lakhs in British auction). 

१९ व्या शतकातील हे लिंबू एका कपाटात वर्षानुवर्ष पडून होते आणि ते लिलावासाठी सादर करण्यात आले. आता इतक्या जुन्या लिंबाचा लिलाव का झाला आणि त्याला इतके महत्त्व का असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकतो. पण या लिंबाला लिलावात थोडीथोडकी नाही तर तब्बल १ लाख ४८ हजार रुपये किंमत आली. अतिशय वाळलेल्या अवस्थेत असलेले हे लिंबू चॉकलेटी रंगाचे असल्याचे दिसते. तसेच ते अतिशय कडक झाले असून त्यावर ४ नोव्हेंबर १७३९ अशा तारखेची नोंद करण्यात आली आहे. 

या लिंबाचा लिलाव करणारे डेव्हीड ब्रेटेल म्हणाले आम्ही गंमत म्हणून या लिंबाचा लिलाव करण्याचे ठरवले. त्याची ४ ते ५ हजार किंमत येईल असे त्यांना वाटले होते. पण हा लिलाव लाखांच्या घरात पोहोचला आणि एक वाळलेले इतक्या वर्षांचे लिंबू इतक्या महाग किमतीला कोणी घेऊ शकते याबाबत आपल्याला खूप आश्चर्य वाटल्याचे ब्रेटेल म्हणाले. त्यावेळी प्रेमाचे प्रतीक म्हणून देण्यात आलेले हे लिंबू भारतातून इंग्लंडला नेण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण वाळलेल्या लिंबाला लिलावात इतकी किंमत मिळणे ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया