Join us  

जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्याचे ३ फायदे, पारंपरिक बैठक आणि पचन क्रियेसाठी उपयुक्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 2:31 PM

Benefits Of Sitting On The Floor While Eating : सगळ्या कुटूंबाने एकत्र आनंदाने जेवणासारखा आनंद नाही, त्यातही पारंपरिक भारतीय पद्धतीची बैठक उत्तम.

हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार आपला बराचसा वेळ हा खुर्ची, सोफ्यावर बसूनच जातो. अभ्यास करण्यासाठी, जेवणासाठी, इतर घरातील कामे करण्यासाठी आपण खुर्चीवरच बसणे पसंत करतो. खुर्च्या आणि सोफ्यावर बसून आपण आपले शरीर आळशी बनवत आहोत. आपण इतके आधुनिक झालो आहोत की, जमिनीवर बसून आपल्याला खायला लाज वाटते किंवा ओशाळ्यासारखे होते. परंतु जमिनीवर बसून खाणे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे करुन देऊ शकतात. एका पायावर पाय ठेऊन आपण ज्या प्रकारे जमिनीवर बसतो ती एक मुद्रा आहे. या आसनात बसून अन्न खाल्ल्याने अन्न पूर्णपणे पचते आणि पचनक्रिया चांगली होते. जेवताना जमिनीवरच मांडी घालून का बसावे? आणि जमिनीवर खाली बसून जेवण जेवल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे समजून घेऊयात(Benefits Of Sitting On The Floor While Eating).

जमिनीवर बसूनच का जेवावे ? 

१. भारतीय पद्धतीनुसार, जेवण जेवताना आपण जमिनीवर पायांची मांडी घालून बसतो. जेवण जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्यासची पूर्वापार परंपरा आपल्याकडे आहे. यामागे एक शास्त्रीय कारण आहे जे आपल्या आरोग्य आणि पचनशक्तीशी निगडित आहे. जेव्हा आपण जेवताना जमिनीवर मांडी घालून बसतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्तप्रवाह क्रॉस पद्धतीने घातलेल्या मांड्यांमुळे पोटातच साठविला जातो. त्यामुळे हा रक्तप्रवाह पायांपर्यंत न जाता मांड्यांमुळे पोटातच अडविला जातो. यामुळे आपल्या पचनक्रियेला चालना मिळून आपण जेवत असलेलं अन्न लगेच पचविले जाते.  

२. जेवण जेवत असताना आपण जमिनीवर मांडी घालून बसतो. मांडी घालून बसणे ही एक पद्धती नसून ते एक आसन आहे. जेवताना आपण ज्या प्रकारात मांडी घालून बसतो त्यास 'सुख आसन' असे म्हणतात. जेव्हा आपण शांतपणे, एका जागी स्थिर बसून, एक प्रकारच्या सुखी आणि शांत वातावरणात अन्नाचे ग्रहण करतो तेव्हा देखील आपल्या अन्नाचे पचन लवकर आणि चांगल्या पद्धतीने होते. 

३. जेव्हा आपण खाली बसून जेवतो तेव्हा आपली पचनक्रिया योग्य प्रकारे चालते. यामुळे आपण केलेले अन्न लवकर पचते. जेव्हा आपण खाली बसून जेवण्याचा आनंद घेत असतो तेव्हा आपण एक योगाआसन देखील करत असतो. जमिनीवर बसून जेवतो तेव्हा आपल्याला अन्नाचा घास घेताना वाकायला लागते. आपण घास घेताना वाकतो आणि परत सरळ होतो अशी क्रिया आपण जेवण संपेपर्यंत करत असतो. असे केल्याने आपल्या पोटातील मांसपेशी निरंतर कार्य करत असतात. असे केल्याने आपली पचन क्रिया योग्य प्रकारे चालते आणि आपले भोजन चांगल्या रीतीने पचते.

जेवताना जमिनीवरच मांडी घालून का बसावे? आणि जमिनीवर खाली बसून जेवण जेवल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे समजून घेण्यासाठी satvic.yoga या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ पाहूयात.    

जमिनीवर खाली बसून जेवण्याचे इतर फायदे :- 

१. खाली बसून भोजन केल्याने आपली पचन क्रिया चांगली होते आणि यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. खाली मांडी घालून भोजन केल्याने आपल्या गुडघ्यांना आराम मिळतो तसेच गुडघे दुखीचा त्रास होत नाही. आपल्या गुडघ्यांमध्ये लवचिकता राहते आणि यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत नाही. 

२. जेंव्हा आपण सगळे एकत्र खाली बसून जेवण जेवतो तेव्हा परिवारातील सदस्यांमध्ये एक प्रकारचे चांगले संबंध प्रस्थापित होतात. जेंव्हा सगळे एकत्र पद्मासनामध्ये बसून जेवण जेवतो तेंव्हा आपला मानसिक तणाव दूर होतो आणि आरोग्य पण ठीक राहते आणि आपल्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करता येतो. 

३. आपले हृदय, शरीर, पचन क्रिया व रक्त संचार योग्य प्रकारे चालत असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपण जास्त काळासाठी निरोगी राहतो. 

४. आपण जेंव्हा जमिनीवर बसून भोजन घेतो तेंव्हा आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या हाडावर जोर पडतो ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो आणि आपली कंबर दुखत नाही. खाली बसल्याने आपला श्वास थोडा मंद होतो, मांसपेशी मधील ताण कमी होऊन शरीरातील रक्तदाब कमी होतो. ज्या मुळे आपल्याला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत आणि हृदया संबंधी आजारांचा धोका टळतो.

५. जमिनीवर बसणं आणि उठणं हा एक चांगला व्यायाम आहे. जेवणासाठी जमिनीवर बसावं लागतं त्यानंतर पुन्हा उठावं लागतं. अर्ध पद्मासनाचे हे आसन हळूहळू जेवणं आणि पचन प्रकियेत मदत करतो. यामुळे वजन नियंत्रित राहतं.

टॅग्स :सोशल व्हायरलहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स