आपले घर स्वच्छ असावे असे आपल्याला कायम वाटते. त्यामुळे आपण घराचे कानेकोपरे बारकाईने साफ करत असतो. कितीही साफसफाई केली तरी घरात सगळीकडे धूळ आणि कचरा होतोच. पण वेळच्या वेळी तो साफ करत राहीला तर घर स्वच्छ राहते नाहीतर खूपच खराब होते. फरशी, टाईल्स हे तर आपण साफ करतोच पण घरातील खिडक्यांच्या काचांवर बसणारी धूळ साफ करणे हे एक मोठे आव्हान असते. या काचा पारदर्शक असतील तर धूळ आणि डागांनी अनेकदा त्यातून पलिकडचे काहीच दिसेनासे होते. खराब झालेल्या काचा आपण ओल्या फडक्याने किंवा कागदाने पुसतो. मात्र तरीही त्यावरचे पाण्याचे किंवा धुळीचे डाग तसेच राहतात. अनेकदा आपल्या घरात स्लायडींग डोअर असेल तर तिथेही काचेचे मोठे दरवाजे असतात. काचेचे हे दरवाजे वेळच्या वेळी साफ करायचे असतील तर काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत (3 Easy hacks to clean glass doors at home easily).
१. बेकींग सोडा
स्वयंपाकासाठी ज्याप्रमाणे आपण बेकींग सोडा वापरतो त्याचप्रमाणे साफसफाईच्या कामांसाठीही बेकींग सोड्याचा चांगला उपयोग होतो. बेकींग सोड्यामध्ये पाणी घालून त्याची एक चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट काचेवर सगळीकडे लावून ठेवा. काही वेळ पेस्ट तशीच लावून ठेवल्यानंतर ओल्या कपड्याने काचा पुसून घ्या. मग या काचा आरशासारख्या चमकायला लागतील. महिन्यातून एकदा हा उपाय केल्यास काचेवर पडलेले डाग साफ होण्यास मदत होईल.
२. व्हिनेगर
व्हिनेगरही साफसफाईसाठी अतिशय उत्तम अशी गोष्ट असते. एका स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर घालून ते काचांवर फवारावे. काही वेळ तसेच ठेवून नंतर एका फडक्याने ते स्वच्छ पुसून घ्यावे. यामुळे खिडकीच्या काचा झटपट साफ व्हायला मदत होईल.
३. डीश वॉश लिक्विड
डीश वॉश लिक्विडने आपण घरातील भांडी घासतो. पण इतर सफाईच्या कामांतही हे लिक्विड अतिशय उपयुक्त ठरते. एका स्पंजच्या साह्याने हे डीश वॉश लिक्विड काचेवर लावायचे. त्यानंतर कापडाने काचा स्वच्छ पुसून घ्यायच्या. २ वेळा काचा पुसल्यानंतर त्या एकदम चकचकीत साफ दिसायला लागतील.