प्लास्टीकचा वापर करायचा नाही असं आपण कितीही ठरवलं तरी आपल्या घरात प्लास्टीकचे थोडे तरी डबे असतातच. वापरायला सोपे, धुवायला सोपे आणि वजनाने हलके असल्याने कोरडा खाऊ, शाळेचे डबे म्हणून किंवा अगदी उरलं-सुरलेलं काहीही ठेवायला आपण या प्लास्टीकच्या डब्यांचा वापर करतो. हे डबे वापरायला सोयीचे असले तरी ते साफ करणे हे एक महत्त्वाचे काम असते. कारण काहीवेळा प्लास्टीकच्या डब्यांना तेलकट पदार्थांचा किंवा इतर गोष्टींचा वास येतो. तसेच यावर कसले डाग पडले तरी ते पटकन निघत नाहीत. त्यामुळे हे प्लास्टीकचे डबे घासणे हे एक महत्त्वाचे काम असते. हे डबे नेहमीच्या साबणाने स्वच्छ निघतातच असं नाही, अशावेळी डबे नीट साफ होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत (3 Easy remedies to clean plastic Containers).
१. कास्टिक सोडा
कास्टिक सोडा हा सफाईच्या कामांसाठी अतिशय उपयुक्त असतो. एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्यायचे. त्यामध्ये साधारण ३ चमचे सोडा घालायचा. प्लास्टिकचे खराब झालेले डबे या बादलीतील पाण्यात घालून ठेवायचे. साधारण अर्धा तासाने हे डबे बाहेर काढून स्क्रबरने घासायचे. यामुळे डब्याचा वास आणि डाग जाऊन ते स्वच्छ होण्यास मदत होईल.
२. लिंबू
लिंबामध्ये असणारे सायट्रिक असिड डबे साफ करण्यासाठी फायदेशीर असते. एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यामध्ये ३ ते ४ लिंबं पिळावीत, यामध्ये व्हिनेगर घालावे आणि प्लास्टिकचे डबे यामध्ये घालून भिजत ठेवावेत. साधारण १० मिनिटांनी हे डबे स्क्रबच्या मदतीने साफ करावेत.
३. लिक्वीड क्लोरीन ब्लिच
हे लिक्वीड क्लोरिन रासायनिक घटक असलेले सफाईसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे लिक्वीड असते. कोमट पाण्यात २ ते ३ चमचे हे लिक्वीड घालायचे आणि त्यात डबे बुडवून ठेवायचे. त्यानंतर १० मिनिटांनी डबे नेहमीप्रमाणे घासायचे. या लिक्वीड मुळे डब्यांची घण निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे प्लास्टिकचे डबे स्वच्छ होण्यासाठी हा अतिशय सोपा आणि चांगला उपाय आहे.