टॉयलेट ही आपण घरात रोज वापरणारी गोष्ट. त्यामुळे हे टॉयलेट स्वच्छ करणेही तितकेच महत्त्वाचे असते. आपण घराच्या फरशा, खिडक्या, सिंक, बेसिन, बाथरुम हे जसे स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण दिवसभर नैसर्गिक क्रियेसाठी वापरत असलेले टॉयलेटही स्वच्छ ठेवायला हवे. त्यामुळे आपल्याला ते वापरायला चांगले तर वाटतेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले असते. काही जण अगदी रोज टॉयलेट घासतात तर काही जण २ दिवसांनी नाहीतर आठवड्यानी टॉयलेट साफ करतात. अनेकांच्या विकेंडच्या कामांच्या यादीत टॉयलेट साफ करणे हे काम आवर्जून असते (3 Easy Tricks for cleaning Toilet).
बरेचदा टॉयलेटमध्ये घाण वास येतो आणि भांडे पिवळट दिसायला लागते. असे झाले की आपल्याला त्याठिकाणी लघवी किंवा संडासला जायला नको वाटते. त्यात घरात पाहुणे येणार असतील तर त्यांनाही असे टॉयलेट वापरणे सोयीचे वाटत नाही. आपण टॉयलेटच्या सफाईसाठी बाजारात रेडीमेड मिळणारे क्लिनर वापरतो. पण त्यापेक्षा घरगुती उपायही फायदेशीर ठरु शकतात. यामुळे सफाईचे हे काम फार वेळखाऊ आणि अवघड न होता सोपे होण्यास मदत होते. पाहूयात टॉयलेट झटपट साफ करण्याच्या ट्रिक्स कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या...
१. व्हाईट व्हिनेगर
व्हिनेगर ही साफसफाईच्या कामांसाठी उपयुक्त असा घटक असून टाईल्स, फरशी अशा गोष्टी साफ करण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. व्हाईट व्हिनेगर एखाद्या स्प्रे बाटलीमध्ये भरुन त्या बाटलीने हे मिश्रण सगळीकडे फवारायचे आणि तसेच ठेवायचे. त्यानंतर साधारण १ तासाने व्हिनेगर मारलेल्या ठिकाणी गरम पाणी घालायचे आणि ब्रशने थोडे घासायचे. पिवळे किंवा इतर सर्व प्रकारचे डाग निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होतो.
२. ग्लिसरीन आणि कोल्ड्रींक
एका स्प्रे बाटलीमध्ये २ कप कोल्ड्रींक घेऊन त्यात १ कप ग्लिसरीन घालून त्यांचे मिश्रण तयार करायचे. हे मिश्रण टॉयलेट सीट आणि आजुबाजूला घालायचे. काही वेळाने ब्रशच्या मदतीने टॉयलेट घासल्यानंतर ते नव्यासारखे चमकताना दिसेल.
३. टूथपेस्ट
टूथपेस्ट ही दात साफ करण्याची गोष्ट आहे. मात्र त्यामध्ये असणारे केमिकल्स साफसफाईसाठी अतिशय उपयुक्त असतात. टॉयलेटमध्ये सगळीकडे टूथपेस्ट टाकायची. ब्रशच्या मदतीने ती सगळीकडे पसरायची. त्यानंतर ३ तास ही पेस्ट त्याठिकाणी तशीच ठेवायची आणि मग टॉयलेट गरम पाण्याने धुवायचे. यामुळे याठिकाणचे विषाणू तर जातातच पण टाईल्सही चकचकीत होतात.