Join us  

बेडशीटवर पडलेले डाग काढण्याचे ३ सोपे उपाय, पदार्थांचे-शाईचे डागही निघतील-चादरी दिसतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 9:35 AM

3 home remedies to remove stain from bed sheet : एखाद दोन डागांसाठी पूर्ण बेडशीट बाद करणं शक्य नसतं.

बेडरुम आणि त्यामध्ये असलेला बेड ही बहुतांश घरातली सर्वात जास्त वापरली जाणारी जागा. बेडरुममध्ये आल्यावर आपण झोपण्यासाठी तर बेड वापरतोच. पण लहान मुलं या बेडवर सतत नाचत असतात. काही वेळा त्यांचं खाणं-पिणंही याच बेडवर होतं. खेळणी, अॅक्टीव्हीटीज, अभ्यास अशा सगळ्या गोष्टी बरेचदा या बेडवरच केल्या जातात. कोणी आलं की आपण गप्पा मारायलाही अगदी सहज बेडवर येऊन बसतो. यामुळेच बेडचा वापर जास्त होतो. बेड चांगला दिसावा आणि आपल्याला त्यावर छान वाटावं यासाठी आपण छान छान बेडशीटस घालतो (3 home remedies to remove stain from bed sheet ). 

वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि रंगांच्या या बेडशीटस दिसायला छान दिसाव्यात अशी आपली इच्छा असते. त्यामुळे त्या नीटनेटक्या आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी ना कधी या बेडशीटसवर काहीतरी सांडतं आणि ते डाग निघता निघत नाहीत. एखाद दोन डागांसाठी पूर्ण बेडशीट बाद करणं शक्य नसतं. अशावेळी हे डाग कसे काढायचे असा प्रश्न आपल्यापुढे असतो. साध्या साबणाने आणि ब्रशने घासून हे डाग निघत नसतील तर ते काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापराव्या लागतात. पाहूयात बेडशीटवरचे डाग काढण्यासाठी नेमकं काय करायचं. 

(Image : Google)

१. हायड्रोजन पॅरॉक्साईड

तेलाचे किंवा सॉस, शाई असे सहज न निघणारे डाग असतील तर हायड्रोजन पॅरॉक्साईड हा उत्तम पर्याय असतो. यासाठी एका भांड्यात हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि लिंबाचा रस एकत्र करायचा. हे मिश्रण या डागांवर लावून काही वेळ तसेच ठेवायचे आणि नंतर ब्रशने घासून बेडशीट साफ करायचे. हट्टी डाग निघून जाण्यास याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

२. बेकींग सोडा 

बेकींग सोड्याचा स्वयंपाकात कमी आणि साफसफाईच्या कामात जास्त उपयोग होतो. बादलीत पाणी घेऊन त्यात बेकींग सोडा घालावा आणि बेडशीट त्यामध्ये अर्धा तास भिजत घालावी.  यानंतर डागाच्या ठिकाणी साबण लावून घासल्यास डाग निघण्यास मदत होते. पण एखाद्या ठिकाणचा नेमका डाग काढायचा असेल तर त्या डागावर विशिष्ट ठिकाणी बेकींग सोडा लावून ठेवावा आणि तो डाग घासावा. 

(Image : Google)

३. व्हिनेगर 

स्वच्छतेच्या कामांसाठी व्हिनेगरही अतिशय उपयुक्त असते. यासाठी अर्धा चमचा कपड्याची पावडर घेऊन त्यात १ चमचा व्हिनेगर घालायचे आणि हे मिश्रण डाग पडलेल्या भागावर लावून ब्रशने डाग घासायचे. हा उपाय एकदा केल्यावर लगेच हट्टी डाग जात नाहीत. पण २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास डाग जाण्यास मदत होते.       

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी