Join us  

स्टीलचे नळ, गॅस शेगडी चकाचक करण्याच्या ३ सोप्या ट्रिक्स, दिवाळीची साफसफाई होईल सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 4:58 PM

3 Simple Hacks To Make Your Stainless steel Shine : स्टेनलेस स्टील स्वच्छ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स...

घरातला कानाकोपरा स्वच्छ असावा यासाठी घरातील महिला नेहमी झटत असतात. तरी कुठे ना कुठे काहीतरी राहतेच. कितीही साफसफाई केली तरी घर पुन्हा पुन्हा खराब होतं आणि आपल्याला ते सतत साफ करत बसावं लागतं. घरात स्टीलची भांडी सोडून इतरही अशा बऱ्याच स्टीलच्या गोष्टी असतात ज्या वारंवार खराब होतात. स्टीलचे नळ, टॉवेल किंवा नॅपकीन होल्डर, गॅसची शेगडी या गोष्टी स्टीलच्या असून रोजच्या वापराने एकतर त्यावर घाणीचा थर साचतो नाहीतर जड किंवा बोअरच्या पाण्याने डाग पडतात. गॅसची शेगडी स्वयंपाकाचे पदार्थ सांडल्याने तेलकट होते (3 Hacks To Make Your Stainless steel Shine) . 

अशावेळी पाण्याने किंवा साबणाने शेगडी आणि नळ घासले तरी ते निघतातच असे नाही. एकतर त्यासाठी खूप जोर द्यावा लागतो. बराच वेळ घासूनही ते चकचकीत होतेच असे नाही. यावरची घाण तशीच राहीली तर एकतर दिसायला घाण दिसते ते वेगळेच पण त्यावर झुरळं, मुंग्या होण्यासही सुरुवात होते. घरात अशी घाण होऊ नये आणि घर स्वच्छ-चकचकीत दिसावं यासाठी हे नळ आणि शेगडी घासण्यासाठी घरच्या घरी करता येतील अशा सोप्या ट्रिक्स माहित असायला हव्यात. दिवाळीच्या दिवसांत आपण सगळेच घराचे डीप क्लिनिंग म्हणजे नेहमीपेक्षा जास्त साफसफाई करतो. त्यावेळी उपयोगी येतील अशा या सोप्या ट्रिक्स कशा वापरायच्या पाहूया...

१. टूथपेस्ट

आपण दात घासण्यासाठी जी टूथपेस्ट वापरतो ती या खराब झालेल्या स्टीलच्या वस्तूंवर लावावाी. त्यानंतर जुन्या झालेल्या टुथब्रशने गॅस शेगडी किंवा नळ घासावेत. त्यानंतर ओल्या फडक्याने ही पेस्ट पुसून घ्यावी. गॅसवर पडलेले चिकट, मेणचट डाग निघून जाण्यास याची चांगली मदत होते. 

२. व्हिनेगर 

व्हिनेगर हे पदार्थांबरोबरच साफसफाईच्या कामात वापरला जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. व्हाईट व्हिनेगर टिश्यू पेपर किंवा कापडावर घेऊन त्याने नळ, नळाच्या आजुबाजूचा स्टीलचा भाग साफ करण्यास चांगला उपयोग होतो. खराब झालेले स्टील चकचकीत दिसण्यासाठी व्हिनेगर फायदेशीर ठरते. 

३. बेबी ऑईल

स्टेनलेस स्टीलच्या वस्तू जितक्या टिकाऊ असतात, दिसायला छान दिसतात तितक्याच त्या मेंटेनही कराव्या लागतात. स्टीलच्या गोष्टींवर पडलेले डाग पटकन दिसत असल्याने त्यांची नियमित स्वच्छता करणे गरजेचे असते. नळ किंवा गॅस शेगडी साबणाने किंवा अन्य कशाने घासल्यानंतर कोरडी करुन त्यावर बेबी ऑईल लावावे. त्यामुळे या स्टीलच्या गोष्टींना चमक येण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स