Join us  

उन्हाळ्यात एसीचा वापर वाढल्याने वीज बिल खूप येते? ३ टिप्स, बिल होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 1:27 PM

3 Simple Tips To Reduce Your AC Bill This Summer : उन्हाळ्यातही एसी चा जास्त वापर करुन आपले वीजबिल कमी येण्यासाठी प्रमुख ३ टिप्स येतील कामी...

उन्हाळ्यांत वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण फॅन, ए. सी, कुलर यांसारख्या गोष्टींचा वापर करतो. उन्हाळ्यात गरमीने आपला जीव कासावीस होतो. अशावेळी आपल्याला फॅन, ए. सी, कुलर यांची वारंवार गरज भासते. काहीवेळा वातावरणातील उष्णता इतकी वाढते की, आपल्याला दिवसभर नाईलाजाने फॅन, ए. सी, कुलर कायम सुरुच ठेवावा लागतो. आपण जर उन्हाळ्यात ही इलेक्ट्रिक उपकरणे सारखी सुरु ठेवली तर वीजबिल देखील तितकेच जास्त येते. उन्हाळा सुरू झाला की वीज बिलातही वाढ होऊ लागते, यामागे ए.सी, फॅन, कुलर यांचा जास्तीत जास्त वापर हे सर्वात मोठे कारण मानले जाते.

वीजबिल कमी यावे म्हणून या इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर थांबवला तर गरमीने जीव हैराण होतो. सतत या उपकरणांचा वापर केला तर वाढत्या वीजबिलाचं देखील टेंशन येत. आपल्या घरातही एसी सारख्या इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर जास्त प्रमाणात केल्याने जर वीजबिल जास्त येत असेल काही टिप्सचा वापर करु शकतो. या टिप्सचा वापर केल्याने उन्हाळात येणाऱ्या लांबलचक वीज बिलापासून आपली सुटका होऊ शकते. उन्हाळ्यात ए.सी चा जास्त वापर करुन देखील वीजबिल कमी येण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात. या टिप्सचा वापर करुन उन्हाळ्यातही ए.सी चा जास्त वापर करुन आपले वीजबिल कमी येण्यास मदत होईल(3 Simple Tips That Can Help You Reduce Your AC Bills This Summer).

उन्हाळ्यांत ए.सी चा जास्त वापर करुन देखील वीजबिल कमी येण्यासाठी टिप्स :- 

१. टायमरचा वापर करावा :- आपल्यापैकी बरेच लोक रात्री एसी चालू करून झोपी जातात अशावेळी एसी तसाच सुरु राहून एसी मधून थंड हवा येतच रहाते. अशा परिस्थितीत आपण झोपेत असल्याने काहीवेळा एसी बंद करण्यासाठी बेडवरुन उठण्याचा कंटाळा करतो. रात्रभर एसी चालू राहिल्याने तुमचे वीज बिल वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसीमधील टायमर वापरलात तर तुमची खोलीही थंड राहते आणि काही वेळाने तुमचा एसीही चालणे बंद होते. टायमरचा वापर केल्याने आपल्याला हवा तेवढा वेळ एसी सुरु राहून नंतर एका ठराविक काळानंतर आपोआप बंद होतो. या पद्धतीचा वापर केल्याने आपल्याला ऐन उन्हाळ्यांत एसीची थंडगार हवाही मिळते व टायमर लावल्याने एसी वेळेत बंद देखील होतो. यामुळे एसीचा वापर करुन देखील वीजबिल कमी येते. 

मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

२. एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करुन घ्या :- एसीचा वापर कारण्यापूर्वी वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करून घ्यावी. सर्व्हिसिंग पूर्ण करून घेतलेला एसी कमी वीज वापरतो. यासोबतच फिल्टर नीट साफ करून घ्यावे किंवा खराब असेल तर लगेच बदलून घ्यावे. घरात ७ ते ८ वर्षे जुना एसी असेल तर तो बदलणे हा पर्याय कधीही उत्तम राहील. जर तुम्ही नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर त्यातील स्टार रेटिंग बघण्यासोबतच इन्व्हर्टवर चालणारा एसी लावावा. त्यामुळे वीज बिलात बचत होईल आणि एसी जास्त चालला तरी विजेचा वापर जास्त होणार नाही.  

उन्हाळ्यात घामामुळे कपडे-रुमाल-टॉवेलला कुबट वास येतो? ४ उपाय, दुर्गंधी गायब...

३. खोली बंद ठेवा :- जर तुम्ही एसी चालवत असाल आणि खोली उघडीच ठेवली आहे, असे करू नये कारण अशावेळी एसीच्या हवेने खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ लागतो. खोलीच्या खिडक्या आणि इतर दरवाजे नीट बंद करून सूर्यप्रकाश आत जाऊ नये म्हणून पडदेही लावावेत. तसेच, फ्रिज, टीव्ही आणि कॉम्प्युटर यांसारखी जड इलेक्ट्रॉनिक उपकरणे खोलीत खूप उष्णता निर्माण करतात, त्यामुळे ती खोलीत ठेवू नयेत. पण जर तुमच्याकडे जागा कमी असेल, तर अशावेळी एसी सुरु करताना घरातील टिव्ही, फ्रिज, कॉम्प्यूटर यांसारखी इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवून मगच एसी सुरु करावा. 

या प्रमुख ३ पद्धतींचा अवलंब करुन आपण उन्हाळ्यांतही एसीचा वापर जास्त करुन कमी वीजबिल आणू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरल