दसरा म्हणजेच विजयादशमी हा वर्षातील मोठा सण असतो. या दिवशी आपण सकाळी देवाची, घरातील गाड्यांची आणि शस्त्र, विद्या यांची पूजा करतो. एकीकडे स्वयंपाकाची तयारी, एकीकडे येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार, साफसफाई असं सगळं असताना महिलांची मात्र पुरती तारांबळ होते. केवळ घरातच नाही तर आपण एकमेकांकडे जेवायला , शुभेच्छा द्यायला आणि आपट्याची पाने म्हणजेच सोनं लुटायलाही जातो(Easy preparations for Dasra at home Dussehra) .
अशावेळी आपली धावपळ होऊ नये आणि शांतपणे आपल्यालाही या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी काही किमान तयारी आधीपासूनच केलेली असेल तर बरे पडते. आता आधीपासूनच तयारी करुन ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. यामुळे तुमचा सणाच्या दिवशीचा वेळ तर वाचेलच पण तुमचे एकूणच काम झटपट होईल आणि तुम्हीही सण एन्जॉय करु शकाल.
१. फुले-हार-तोरण
दसरा म्हणजे फुलं आणि हाराला विशेष महत्त्व असतं. झेंडूच्या फुलांचे तोरण यादिवशी आवर्जून घरावर लावले जाते. इतकेच नाही तर देवघर, देवाचा एखादा मोठा फोटो, दुचाकी, चारचाकी यांनाही फुलांचे हार घालण्याची रीत असते. बाजारातून आधीच फुले आणून तोरण, हार करुन ठेवले तर ऐनवेळी धावपळ होत नाही. यासाठी योग्य ते माप घेऊन विविध कॉम्बिनेशनचे हार तयार करता येतात. यात आवडीप्रमाणे इतर रंगीत फुले, आंब्याची पाने लावली की हे हार आणि तोरण छान दिसतात.
२. पुजेची तयारी
दसरा म्हणजेच विजयादशमी. या दिवशी घरोघरी सरस्वतीची, घरातील शस्त्रांची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यासाठी घरातील लहान मुलांची वह्या-पुस्तके, पाटी, शस्त्रे असतील तर ती, आपल्या कामाच्या फाईल्स, लॅपटॉप हे सगळे आधीच एका टेबलवर मांडून घ्या. यासाठी आपण लहान मुलांचीही मदत घेऊ शकतो. आधीच मांडलेले असेल तर पूजा करायला वेळ लागत नाही. पाटीवर लक्ष्मी आधीच काढून ठेवायची म्हणजे त्यात जाणारा वेळही वाचतो.
३. कपडे-दागिन्यांची तयारी
घरातील प्रत्येक जण दसऱ्याला काय घालणार आहे याचे आधीच नियोजन करायला हवे. त्यानुसार कपडे धुतलेले, इस्त्री केलेले आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे. त्या कपड्यांवर घालता येईल अशी ज्वेलरी, हेअरस्टाइल, चपला किंवा बूट, पर्स यांचे नियोजन असेल तर ऐनवेळी या सगळ्याची जुळवाजुळव करण्यात वेळ वाया जाणार नाही.