घरातील टॉयलेट आणि बाथरुम या दिवसभर वापरल्या जाणाऱ्या जागा. घरातील सर्वच मंडळी कधी हात पाय धुण्यासाठी तर कधी आंघोळ, कपडे धुणे अशा विविध कामांसाठी बाथरुमचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे टॉयलेटचाही आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून वापर करत असतो. यामुळे किंवा दिवसभर टॉयलेट-बाथरुमची दारं बंद असल्याने याठिकाणी एकप्रकारचा कुबट वास येतो. अचानक दार उघडले की या वासाने आपल्याला कसेसेच होते. हल्ली टॉयलेट आणि बाथरुम अनेकदा एकत्रच असतात, त्यामुळे तर हा वास येण्याची शक्यता जास्त असते (3 Tips to Keep our bathroom smelling Fresh).
अनेक जण ही दोन्ही ठिकाणे दररोज साफ करतात तर काही जण विकेंडला हे घासण्याची मोहीम हाती घेतात. अशी साफसफाई करुनही याठिकाणचा वास जातोच असे नाही. अशावेळी आपण त्याठिकाणी केमिकल्स असलेले वास जाण्यासाठीचे बाजारात मिळणारे एयर फ्रेशनर लटकावतो. मात्र हा वास नैसर्गिकरित्या घालवायचा असेल तर घरच्या घरी काही सोपे उपाय करता येतात. त्यामुळे टॉयलेट-बाथरुममध्ये येणारा कुबट वास जाण्यास नक्कीच उपयोग होतो. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे...
१. शॉवरमध्ये निलगिरीच्या पानांची फांदी अडकवणे. निलगिरीला नैसर्गिक असा एकप्रकारचा उग्र वास असतो. यामुळे बाथरुममध्ये नैसर्गिक निलगिरीचा वास येतो आणि कुबट वास जाण्यास मदत होते.
२. टॉयलेटमध्ये मागच्या बाजुला असणाऱ्या टँकमधील पाण्यात व्हाईट व्हिनेगर टाकावे. यामुळे या ठिकाणहून खराब वास येत असेल तर तो जाण्यास मदत होते. या व्हिनेगरचे प्रमाण साधारण १ कप असायला हवे.
३. कापसाच्या बोळ्यावर इसेन्शियल ऑईल घालून हे बोळे टॉयलेट किंवा बाथरुमच्या आसपास असणाऱ्या डस्टबिनच्या तळाशी टाकून ठेवावेत. काहीवेळा आपण जो कचरा टाकतो त्याला वास येण्याची शक्यता असते. इसेन्शियल ऑईलला एकप्रकारचा चांगला वास असल्याने हा खराब वास जाण्यास मदत होते.
टॉयलेट फ्रेशनर कसा तयार करावा...
एका बाऊलमध्ये ३ चमचे बेकींग सोडा, १० चमचे इसेन्शियल ऑईल आणि १ चमचा कोणतेही बेबी ऑईल एकत्र करावे. यामध्ये साधारण १ चमचा लवंगा घालाव्या. हे सगळे मिश्रण एखाद्या छानशा डिझायनर बाऊलमध्ये ठेवायचे आणि टॉयलेट किंवा बाथरुममध्ये ठेवून द्यायचे. यामुळे याठिकाणचा कुबट किंवा कोणताही वास निघून जाण्यास मदत होते.