किचनमध्ये असंख्य लहान मोठी कामं असतात. स्वयंपाक केलेला दिसतो पण बाकीची कामं दिसून येत नाहीत. मात्र ती कामं करण्यात आपला जास्त वेळ आणि एनर्जी जात असते. किराणा सामान आणण्यापासून ते नीट लावण्यापर्यंत आणि रोजच्या वापरासाठी लागेल तसं काढून घेणं हे एक महत्त्वाचंच काम असतं. आपण साधारणपणे महिना किंवा २ महिन्यांचा किराणा भरतो. पण एकावेळी इतकं वापरत नसल्याने रोजच्या वापरापुरते सामान आपण वर लहान डब्या-बरण्या यांमध्ये काढून ठेवतो. बाकीचं सामान आपण जास्तीचं म्हणून ठेवून देतो (3 Tricks for filling bottle of oil without spilling Kitchen Tips).
चहा-साखरेचे डबे, मसाल्याचा डबा, तेलाची बरणी किंवा बुदली अशात आपण हे रोजचे सामान लागेल तसे काढतो. ते संपले की मात्र आपल्याला मोठ्या डब्यातून ते पुन्हा काढावे लागते. तेलाच्या एकतर पिशव्या असतात नाहीतर कॅन किंवा बाटल्या असतात. त्यातून बुदली, बरणीत तेल काढताना ते हमखास सांडतं आणि सगळीकडे तेलाचे ओघळ येतात. इतकंच नाही तर कढईमध्ये राहीलेलं तेल बाटलीत ओततानाही ते सगळीकडे सांडण्याचीच शक्यता जास्त असते. मग सगळंच तेलकट होतं आणि ते साफ करणं हे आणखी एक वाढीव काम होतं. पण असं होऊ नये आणि सगळं स्वच्छ राहावं यासाठी काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत.
१. तेल कोमट करावं, कारण...
तेल हे पाण्यापेक्षा काही प्रमाणात घट्ट असतं. त्यामुळे आपण जेव्हा ते ओततो तेव्हा ते एकाच धारेने न पडता सगळीकडे पसरतं आणि सांडण्याचीच शक्यता जास्त असते. असे होऊ नये आणि तेलाची नीट एकसारखी धार पडावी यासाठी तेल कोमट करायचं. जेणेकरुन त्याचा घट्टपणा काही प्रमाणात कमी होतो आणि ते बाटली किंवा बरणीत भरणे सोपे होते.
२. पिशवीतून तेल ओतताना
आपण पिशवी कापताना साधारणपणे कात्रीने त्याला तिरका किंवा आडवा कट देतो. मग आपण ही पिशवी तिरकी करुन तेल बरणीत ओततो. पिशवी तेलकट झाली की ती हातातून सटकते आणि तेल बाहेर सांडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कात्रीने असा कट न देता अगदी लहान म्हणजे आपण मेहेंदीच्या कोन मेहेंदी येण्यासाठी जितका कापतो तितकेच कापायला हवे. त्यामुळे तेलाची बारीक धार येऊन तेल बरणीमध्ये नीट भरले जाण्यास मदत होईल.
३. ऑईल डिस्पेन्सर, नरसाळे
बाजारात किचनमधील काम सोपे व्हावे यासाठी विविध प्रकारची उपकरणे सध्या अगदी सहज मिळतात. यामुळे आपला कामातील वेळ आणि कष्ट वाचतात. मात्र त्याची पुरेशी माहिती नसल्याने आपण जुन्याच पद्धती वापरत राहतो. बाजारात मिळणारे पारंपरिक पद्धतीचे नरसाळे किंवा ऑईल डिस्पेन्सर याचा वापर आपण तेल बाटली किंवा बरणीत ओतण्यासाठी नक्कीच करु शकतो. त्यामुळे अजिबातच तेल सांडत नाही.