घर साफ करत असताना, घरातील कानाकोपऱ्यातील सफाई आपण करतो. मात्र, बहुतांशवेळा वॉश बेसिन साफ करण्याचे राहून जाते. सततच्या वापरामुळे बेसिन नेहमी ओलसर राहते. जर घरातील पाणी क्षारयुक्त असेल तर, क्षारांचा परिणाम बेसिनवर होतो. त्यामुळे वॉश बेसिनवर पिवळे आणि काळे डाग पडतात. हे डाग साफ करताना नाकीनऊ येतात. मेहनत घेऊन देखील डाग सहसा निघत नाही.
कालांतराने, हे डाग केवळ हट्टी होत नाहीत तर, वॉश बेसिनच्या पृष्ठभागाचेही नुकसान करतात. त्यामुळे हे डाग एक - दोन वेळा साफ करून निघणाऱ्यातले नसतात, हे डाग काढण्यासाठी काही ट्रिक्स आपल्या कामी येतील. या सोप्या घरगुती टिप्समुळे मेहनत, वेळ व पैसे या तिन्ही गोष्टींची बचत होईल. अवघ्या १० रुपयांमध्ये आपण वॉश बेसिनमधील हट्टी पिवळे डाग काढू शकता. ते कसे पाहा..
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
वॉश बेसिन साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करा. याच्या मिश्रणाने वॉश बेसिनचा पिवळटपणा नाहीसा होईल. वॉश बेसिन तर स्वच्छ होतीलच, यासह ब्लॉक पाईप देखील साफ होईल. बेकिंग सोड्याच्या वापरामुळे वॉश बेसिनमधून येणारी दुर्गंधीही क्षणार्धात निघून जाईल.
असे करा वापर
वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम, वॉश बेसिनवर दोन चमचा बेकिंग सोडा शिंपडा. हा सोडा पाईपमध्ये देखील टाका, त्यानंतर व्हाईट व्हिनेगर वॉश बेसिनमध्ये टाका. दोन तास तसेच राहू द्या नंतर पाणी टाकून स्क्रबरने बेसिन घासून घ्या. यामुळे बेसिन स्वच्छ होईल.
कोल्डड्रिंकने साफ करा बेसिन
जर घरी बेकिंग सोडा उपलब्ध नसेल तर, कोल्डड्रिंकचा वापर करा. त्यातील अॅक्टिव्ह सोडा, बेसिन साफ करण्यास मदत करेल. बेसिन साफ करण्यासाठी ब्लॅक कोल्डड्रिंकचा वापर करू नका. यामुळे बेसिनवर काळे डाग पडतील. इतर कोल्डड्रिंकचा वापर करा.
लिंबू आणि व्हिनेगरचा वापर करा
वॉश बेसिनमधील पिवळे डाग काढण्यासाठी लिंबू आणि व्हिनेगरचा वापर करा. यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा. हे मिश्रण डागांवर टाका आणि ७ ते ८ मिनिटांनंतर डाग घासून काढा. लिंबामधील अॅसिटिक गुणधर्मामुळे बेसिनमधील पिवळे डाग निघून जातील. यासह दुर्गंधी निघून घरात सुवास दरवळेल.