Join us  

32 इंच पराठा, 72 प्रकार! हाॅटेलची ऑफर, एक पराठा खा 1 लाख जिंका, पण हरलात तर .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 8:42 PM

कैलाश शर्माच्या 32 इंची पराठ्यामुळे जयपूरची ओळखही दिल्लीसारखी पराठा विशेष झाली आहे. कैलाश शर्मा यांच्या जयपूर येथील जयपूर पराठा जंक्शन रेस्टाॅरण्टमध्ये केवळ 32 इंची पराठाच भेटतो असं नाही तर 32 इंची पराठ्याच्या 72 चवी चाखता येतात. 

ठळक मुद्दे2018 मध्ये कैलाश शर्मा यांनी जयपूरमधे जयपूर पराठा जंक्शन सुरु केलं.संपूर्ण कुटुंबानं एकत्र येत पराठ्याचा आस्वाद घ्यावा यासाठी कैलाश यांनी 32 इंची पराठा तयार करण्याचं ठरवलं.32 इंची पराठ्याच्या 72 चवी कैलाश शर्मा यांच्या रेस्टाॅरण्टमधे चाखायला मिळतात. 

शेफचं नाव: कैलाश शर्मा,जयपूरा पराठा जंक्शन, न्यू सांगानेर रोड, जयपूर .  नाव आणि पत्ता कशासाठी असा प्रश्न पडला असेल ना वाचून? पण पुढचं वाचून प्रश्न पडून शोधाशोध करावी लागू नये यासाठी आधीच उत्तराची तजवीज करावी म्हणून नाव पत्ता आधीच सांगितला. कैलाश शर्मा हा केवळ शेफ आहे अशी ओळख सांगणं म्हणजे त्याच्या पराक्रमावर अन्याय केल्यासारखं होईल. कैलाश शर्मा हा 32 इंची पराठ्याचा कर्ता धर्ता आहे.  चविष्ट आणि विविध प्रकारचे पराठे कुठे मिळतात असा प्रश्न कोणी विचारला तर डोळे झाकून उत्तर देणारा दिल्ली असं म्हणतो. अर्थात उत्तर देणारा चूक आहे असं नाही. पण खरं उत्तरही एवढंच नाही. कैलाश शर्माच्या 32 इंची पराठ्यामुळे जयपूरची ओळखही दिल्लीसारखी पराठा विशेष झाली आहे. कैलाश शर्मा यांच्या जयपूर येथील जयपूर पराठा जंक्शन रेस्टाॅरण्टमध्ये केवळ 32 इंची पराठाच भेटतो असं नाही तर 32 इंची पराठ्याच्या 72 चवी चाखता येतात. 

Image: Google

कैलाश शर्मा यांच्या रेस्टाॅरण्टमध्ये पराठ्याचे दिवाने खवय्ये हे एकटे दुकटे जातच नाही. 4-5 जणांची टीम घेऊनच 32 इंची पराठ्याची ऑर्डर दिली जाते. पण कोणी एकट्याने हा पराठा ऑर्डर केला तर कैलाश शर्मा यांची काही हरकत नसते. पण एकट्याकडून हा 32 इंची पराठा संपणं अशक्यसासा कैलाश शर्मा यांचा दावा आहे. कोणी एकट्याने हा 32 इंची पराठा खाऊन दाखवला तर कैलाश शर्मा त्याला/ तिला 1 लाख रुपये  बक्षिस आणि पुढे आयुष्यभर  रेस्टाॅरण्टमध्ये पराठा फुकट  देण्यास तयार आहे.  अजूनपर्यंत हा पराक्रम कोणी केला नाही. पण कैलाश शर्मा तो पराक्रम कोणीतरी करुन दाखवेल याची वाट पाहात आहे. 

Image: Google

32 इंची पराठ्याची गोष्ट

 कैलाश शर्मा  यांच्या 32 इंची पराठा तयार करण्यासाठी 2 किलो कणिक, दिड किलो सारण लागतं. या पराठा लाटण हे एक आव्हान आहे. सारणाचा छोटा पराठा करताना देखील तो फाटण्याची शक्यता असते. पण कैलाश शर्मा हा पराठा न फाटता लाटतात. तो भाजताना फुटत देखील नाही. हा पराठा लाटण्यासाठी 40 इंची लाटण्याचा वापर केला जातो.  32 इंची पराठा भाजण्यासाठी 50 इंचाचा तवा कैलाश शर्मा यांनी तयार करुन घेतला आहे. या पराठ्यासाठी मसाल्याचे 20 प्रकार  वापरले जातात. हे मसाले कैलाश शर्मा यांनी स्वत: तयार केले आहेत.  हा पराठा भाजण्यासाठी साजूक तुपाचा वापर केला जातो. 

Image: Google

कैलाश शर्मा यांनी  2018मध्ये जयपूरमध्ये जयपूर पराठा जंक्शन सुरु केलं. लोकांनी कुटुंबासमवेत, मित्रमंडळीसमवेत येवून आपल्याकडील पराठ्याचा आस्वाद घ्यावा या उद्देशाने त्याने 32 इंच पराठा तयार केला. कैलाश शर्मा यांचा हा 32 इंची पराठा जितक्या चवीने खाल्ला जातो तितक्याच चवीने त्याची चर्चा जगभर होते आहे. 

लेखाच्या वर दिलेला पत्ता आधी लिहून ठेवा. कधी जयपूरमध्ये गेलात तर या पत्त्यावर जावून 32 इंची पराठा पाहा, खा.. जमल्यास एकट्यानं खाऊन कैलाश शर्मा यांनी लावलेली लाखाची पैज जिंका नाही तर 700 रुपये पराट्याचं बील चुकतं करुन अजब पराठा खाल्ल्याचं समाधान पोटात आणि मनात साठवून घरी या! 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न