दात हा आपल्याला असणाऱ्या अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव असतो. आपण खात असलेले अन्न चावण्यासाठी या दातांचा उपयोग होतो. आपल्या सगळ्यांच्याच तोंडात साधारणपणे ३२ दात असतात. लहानपणी एखादा दात पडण्याआधीच नवीन दात आले तर या दातांची संख्या १ किंवा २ ने जास्त होऊ शकते. पण त्यापेक्षा जास्त दातांसाठी तोंडात जागाच नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दात यायला लागल्यापासून ३२ दातांपर्यंतच दात येऊ शकतात. मात्र एका भारतीय महिलेला त्याहून जास्तीचे म्हणजे एकूण ३८ दात आहेत. नेहमीपेक्षा ६ जास्त दात कसे आले आणि ते तोंडात नेमके कसे आहे ही आश्चर्याची बाब आहे. पण त्याहीपेक्षा ती जगातील सर्वात जास्त दात असणारी एकमेव महिला असल्याने तिची चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली (26 year old Indian woman Kalpana Balan with 38 teeth sets Guinness book of world record).
कल्पना बालन असे या महिलेचे नाव असून ती अवघ्या २६ वर्षांची आहे. अशाप्रकारे जास्तीचे दात असण्याला वैद्यकीय भाषेत हायपरडोंटिया किंवा पॉलीडोंटीया म्हणतात. जगभरात ३.८ टक्के लोकांना ३२ पेक्षा जास्त दात असतात. कल्पना यांना वरच्या बाजूला ४ तर खालच्या बाजूला २ दात जास्तीचे आहेत. महिलांमध्ये सर्वाधिक दात असण्याचा मान या महिलेला मिळाला असला तरी पुरुषांमध्ये सर्वाधिक दात असणाऱ्यांमध्ये कॅनडाच्या इवानो मेलोन याचा पहिला क्रमांक लागतो, त्याला ४१ दात आहेत. लहानपणापासूनच कल्पना यांना जास्त दात असल्यामुळे त्यांचे घरातले चिंतेत असायचे.
Kalpana Balan from India has six more teeth than the average human.
— Guinness World Records (@GWR) November 20, 2023
Read more by clicking the picture 👇
मग त्यांनी हे जास्तीचे दात काढून टाकण्याचे ठरवले. पण डॉक्टरांनी त्यांना लहान वयात दात न काढण्याचा सल्ला दिला. कल्पना यांचे वय वाढत गेले तसे हे दात तोंडात सेट होत गेले आणि त्यांना त्यापासून कोणताही त्रास भेडसावत नसे. पण या जास्तीच्या दातांमुळे त्यांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली, ज्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण अशाप्रकारे सन्मान झाल्याने आपण खूप खूश असल्याचे कल्पना म्हणाल्या. इतकेच नाही तर त्यांच्या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्यांना आणखी २ दात येण्याची शक्यता आहे.