Join us  

स्वयंपाक घरातील चिमणी तेलकट डागाने झाली काळीकुट्ट ? ४ सोपे उपाय... चिमणी चमकेल नव्यासारखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 7:57 PM

Easy Tips to Clean Your Greasy Kitchen Chimney at Home : स्वयंपाकघरातील चिमणी साफ करणे हे एक कठीण काम असते, जर आपल्यालाही चिमणी स्वच्छ करण्याचे टेंशन येत असेल तर या आहेत काही सोप्या टिप्स...

बदलत्या काळानुसार किचनचे स्वरुप देखील बदलत आहे. किचनमधील धूर, वाफ सगळे खेचून बाहेर टाकण्यासाठी पूर्वी किचनमध्ये एग्जास्ट फॅन असायचे. परंतु या एग्जास्ट फॅनची जागा आता किचन चिमणीने घेतली आहे. भारतीय स्वयंपाकामध्ये भरपूर मसाले आणि तेलांचा समावेश असतो, यामुळे स्वयंपाक करताना नेहमी किचनध्ये धूर होतो. या धुराला घालवण्यासाठी एग्जास्ट फॅन किंवा चिमणी यांसारख्या उपकरणांचा आपण वापर करतो. किचनमध्ये असणाऱ्या चिमणीचा वापर तर आपण रोज करतोच. 

रोजचा स्वयंपाक करताना किचनमध्ये फोडणी, वाटणघाटण हे तर आपण करतोच. यामुळे जो धूर निर्माण होतो. हा सगळा धूर चिमणी शोषून घेते. त्यामुळे या धुरामार्फत तेल, मसाल्यांचे डाग, वास हे सगळे चिमणी व त्याच्या आजूबाजूला जाऊन चिकटतात. किचनमधील स्वयंपाक करताना उडालेले तेल, मसाले हे सगळे चिमणीच्या फिल्टरमध्ये जाऊन अडकतात. यामुळे चिमणी खराब होते. तसेच या चिमणीचे फिल्टर खराब झाल्यामुळे त्याला चिकटलेले तेल, मसाले किंवा त्यातील धूळ खाली पडून किचन खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत चिमणी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. तसेच या चिमणीवरचे डाग, चिकट मळ जाता जात नाही. यासाठी काही सोप्या घरगुती पद्धतींचा वापर करून आपण घरच्या घरी ही चिमणी स्वच्छ करु शकतो(4 Easy Ways : How to clean chimney filter at home without spending more time and money).

घरच्या घरी सोप्या पद्धतीने किचनमधील चिमणी स्वच्छ करण्याचे सोपे उपाय :- 

१. डिशवॉशिंग लिक्विड :- डिशवॉशिंग लिक्विडमध्ये असलेले घटक चिमणी फिल्टरवर जमा झालेले ग्रीस आणि तेल सहजपणे काढून टाकू शकते. ते साफ करण्यासाठी चिमणीतील फिल्टर काळजीपूर्वक काढून घ्यावा. त्यानंतर स्पंज वापरून, फिल्टरवर डिशवॉशिंग लिक्विड लावून हलक्या हाताने रगडून घ्यावे.  आता एका बादलीत गरम पाणी भरा आणि पाण्याच्या आत फिल्टर ठेवा. काही काळासाठी हा फिल्टर तसाच राहू द्या. नंतर फिल्टर पाण्यातून बाहेर काढा आणि स्क्रबरने घासून घ्या. शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा आणि पूर्णपणे कोरडे होऊ द्या.

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

२. व्हिनेगर :- व्हिनेगर बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध असते. तसेच व्हिनेगरचा उपयोग घरातील स्वच्छतेसाठी केला जातो. व्हिनेगरमध्ये जंतुनाशक गुणधर्म देखील असतात. व्हिनेगर वापरून फिल्टर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी एक लहान टब गरम उकळत्या पाण्याने भरा. आता त्यात १ ते २ कप व्हिनेगर घाला आणि चांगले मिक्स करा. आता या द्रावणात चिमणी फिल्टर बुडवा आणि १ ते २ तास राहू द्या. थोड्यावेळाने फिल्टर काढा आणि स्क्रबरने स्वच्छ करा. नंतर त्यांना ओल्या कापडाने पुसून टाका आणि पुन्हा फायरप्लेसमध्ये ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.    

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

३. बेकिंग सोडा :- घराच्या साफसफाईमध्ये बेकिंग सोड्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बेकिंग सोडा कोणत्याही वस्तूच्या पृष्ठभागाला कोणतेही नुकसान न करता वंगण आणि तेलाचे डाग सहजपणे काढून टाकतो. यासाठी दोन चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करुन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चिमणीच्या पृष्ठभागावर लावा आणि ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. चिकटपणा, तेलकटपणा घालवण्यासाठी ते ओल्या कपड्याने किंवा स्क्रबरने घासून पुसून टाका. जर चिमणी खूप घाण असेल तर आपण गरम पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करुन त्यात फिल्टर ठेवल्यानंतर थोड्या वेळाने तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. 

४. पेंट थिनरचा वापर करावा :- पेंट थिनर एक शक्तिशाली सफाई एजंट आहे. या थिनरमध्ये असलेले एसीटोन, टोल्युइन, टर्पेन्टाइन आणि इतर खनिज स्पिरिट्स हट्टी आणि चिकट घाण लवकर काढून टाकण्यास मदत करतात. पेंट थिनरचा उपयोग करताना चिमणीचा बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी, एक कापूस किंवा मायक्रोफायबर कापड पेंट थिनरमध्ये बुडवा. त्यानंतर चिमणीचा बाह्य भाग किंवा फिल्टरला लावून घ्यावे. आता ते थोडावेळ तसेच राहू द्या, नंतर चाकू किंवा चमच्याच्या मदतीने चिमणीची सर्व घाण खरडून स्वच्छ करा.

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स