शक्यतो आपल्या बाथरुममध्ये आजकाल आरसा असतोच. बाथरुममध्ये असणाऱ्या या आरश्याचे अनेक फायदे आहेत. काहीवेळा फेसपॅक लावायचा तर, चेहेरा स्वच्छ झाला आहे की नाही अशा इतर अनेक कारणांसाठी आपण बाथरुममध्ये आरसा बसवून घेतो. हा अनेक फायदा असणारा आरसा बाथरुममध्ये कुठेही बसवला तरी, आंघोळ केल्यावर आरशावर धुके साचून राहण्याची एक समस्या आपल्याला नेहमी सतावत असते. बाथरुममध्ये आंघोळ केल्यानंतर आरशावर धुके साचते, या कारणांमुळे आपल्याला आरसा सतत स्वच्छ ठेवावा लागतो.
आरशावर सतत असलेल्या या धुक्यामुळे आपल्याला आरशात नीट पाहता येत नाही. तसेच आरशात पाहायचे झाल्यास तो वारंवार पुसून घ्यावा लागतो. जेव्हा आपण बाथरूममध्ये आंघोळ करतो तेव्हा पाण्यात असलेल्या वाफेमुळे आरशावर वाफ जमा होते. या वाफेमुळे आरसा धुरकट होऊन आपल्याला त्यात नीट दिसत नाही. अशावेळी सतत आरसा पुसण्यापेक्षा काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात. तुम्हालाही बाथरुममध्ये असणाऱ्या आरशाचा असाच त्रास होत असेल तर तुम्ही काही टिप्सची मदत घेऊ शकता. यामुळे तुमचा बाथरूमचा आरसा नेहमी स्वच्छ आणि चमकदार राहील(4 Easy Ways To Stop a Bathroom Mirror From Steaming Up).
आरशावर वाफ साचून तो धुरकट होऊ नयेत यासाठी खास टिप्स :-
१. व्हिनेगरचा वापर करावा :- जर तुम्हाला बाथरूमच्या आरशावर सतत वाफ साचून आरसा धुरकट पडू नये असे वाटत असेल, तर त्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात व्हाईट व्हिनेगरचे काही थेंब घालावेत. यानंतर त्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब घालून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवावे. त्यानंतर या स्प्रेची बाथरूमच्या आरशावर फवारणी करावी. कोरड्या कापडाच्या किंवा स्पंजच्या मदतीने बाथरूमचा आरसा स्वच्छ करावा. या उपायाचा वापर करून, आपण कमी पैशात आरशावर जमा होणारी वाफ दूर करू शकाल.
अस्सल देवगड 'हापूस' कसा ओळखाल? ६ टिप्स, पैसे मोजताय तर घ्या अस्सल आंबा...
२. ग्लिसरीनचा वापर करावा :- काच स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा देखील वापर करु शकता. काच स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात ग्लिसरीनचे तीन ते चार थेंब घालावेत. त्यानंतर काच आधी कापडाने स्वच्छ करुन मग स्पंजला ग्लिसरीन लावून काच स्वच्छ करुन घ्यावी. यामुळे बाथरूममध्ये लावलेला आरसा चमकेल आणि आंघोळीनंतर आरसा धुरकट पडणार नाही.
३. आरसा कापडाने झाकून ठेवावा :- बाथरुममधील आरशावर आंघोळीच्या गरम पाण्याची वाफ साचून राहू नये म्हणून आपण हा आरसा कपड्याने झाकून ठेवू शकता. यामुळे गरम पाण्याची वाफ या आरशावर साचून राहणार नाही, परिणामी आरसा धुरकट दिसणार नाही. अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर आरसा आधी नीट झाकून ठेवावा, कारण गरम पाण्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेमुळे आरशावर वाफ तयार होते. अशा स्थितीत आरसा आधी झाकून ठेवल्यास असे होणार नाही.
४. डिशवॉशिंग लिक्विडचा वापर करावा :- बाथरूमच्या आरशावर फॉगिंगची समस्या डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने सोडवली जाऊ शकते. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब घालावेत. यानंतर आरशावर या मिश्रणाचा स्प्रे फवारावा. त्यानंतर हा आरसा पूर्णपणे स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. या डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने काच चमकेल आणि काचेवरील साचलेली वाफ साफ होण्यास मदत होईल.
डास चावल्यामुळे चेहऱ्यावर - हातापायांवर पुरळ येते, आग होते, खाज सुटते? ५ सोपे घरगुती उपाय...