घराच्या सफाई कामात टाॅयलेट बाथरुमची (toilet bathroom cleaning) स्वच्छता करणं हे फार कंटाळवाणं काम असतं. एकतर रोजच्या घाईत अनेकजणंना रोजच्या रोज टाॅयलेट बाथरुम स्वच्छ करण्यास वेळ मिळत नाही आणि एखाद दिवशी वेळ मिळाला तर टाॅयलेट बाथरुम चटकन साफ कसं होईल याची काही युक्ती सूचत नाही. टाॅयलेट बाथरुम साफ करण्यात खर्ची पडणारा वेळ आणि लागणारी मेहनत यामुळे हे कामच नकोसं होतं. पण टाॅयलेट बाथरुमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं आरोग्यास घातक ठरु शकतं. काही सोप्या युक्त्या वापरुन टाॅयलेट बाथरुमची स्वच्छता ( easy tricks for cleaning toilet bathroom instantly) झटक्यात करता येते.
Image: Google
टाॅयलेट बाथरुमची स्वच्छता करताना..
1. टाॅयलेट बाथरुममध्ये खूप दुर्गंधी येत असल्यास एक सोपा उपाय करावा. सौंदर्य प्रसाधनातील टाल्कम पावडरमुळे ही दुर्गंधी सहज दूर होते. यासाठी टाॅयलेट बाथरुम धुण्याआधी टाल्कम पावडर टाॅयलेटच्या पाॅटमध्ये आणि बाथरुममध्ये टाकून ठेवावी. नंतर 15-20 मिनिटांनी टाॅयलेट बाथरुम स्वच्छ धुवून घ्यावं. दुर्गंधी जास्त असल्यास हा उपाय लागोपाठ 2-3 दिवस करावा.
2. बाथरुममधल्या बेसिनचं भांडं हे फारच पिवळसर आणि खराब झालं असेल तर स्क्रब्रवर टूथपेस्ट घ्यावी आणि त्याने बेसिन घासावं. बेसिन, बाथरुम आणि टाॅयलेटमधील खराब झालेले स्टीलचे नळ देखील या उपायनं चकाचक होतात. स्क्र्बरवर टूथपेस्ट सोबत थोडा बेकिंग सोडाही घालावा. स्क्रबरनं बेसिन आणि नळ घासल्यानंतर 5 ते 7 मिनिटं ते तसंच राहू द्यावं आणि मग बेसिन आणि नळ पाण्यानं स्वच्छ धुवावे. नंतर नळ आणि बेसिन टिश्यू पेपरनं पुसून घेतल्यास त्यावरील डाग स्वच्छ होतात. टूथपेस्टमध्ये असलेल्या केमिकल्समुळे बेसिन आणि नळ सहज स्वच्छ होतात.
Image: Google
3. बाथरुममधील आरसा धुरकट झालेला असल्यास, पाण्याच्या डागानं खराब झालेला असल्यास तो स्वच्छ करण्याचा सोपा उपाय म्हणजे स्प्रे बाॅटलने आरश्यावर पाणी स्प्रे करावं आणि मग वर्तमानपत्राच्या कागदानं आरसा पुसून काढावा. या उपायानं आरसा काही मिनिटात स्वच्छ होतो.
4. बाथरुममधील प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब पाण्याच्या सततच्या संपर्कानं पिवळट पडले असतील, चिकट झालेले असतील तर तेही झटक्यात स्वच्छ होऊ शकतात. यासाठी बादली आणि टबमध्ये थोडी डिटर्जंट पावडर आणि थोडा बेकिंग सोडा आणि थोडं व्हिनेगर एकत्र घालून ठेवावं. 5-10 मिनिटांनी घासणीनं बादली आणि टब स्वच्छ घासून पाण्यानं धुवून घेतल्यास बादली आणि टबचा पिवळटपणा आणि चिकटपणा निघून जातो.