कुणाकडे दिड दिवसांचा गणपती असतो, तर कुणाकडे तीन दिवसांचा. काही ठिकाणी ५ दिवसांचा तर काही ठिकाणी अगदी १० दिवस गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात गणपतीला फुलं, दुर्वा मोठ्या प्रमाणात वाहिलं जातं. दिवस संपला की दुसऱ्यादिवशी त्याचं निर्माल्य (nirmalya) होतं. गणेशोत्सव झाल्यानंतर हे निर्माल्य टाकून देण्यापेक्षा किंवा गणपती विसर्जनासोबत त्याचंही पाण्यात विसर्जन (Re-use of nirmalya) करण्यापेक्षा त्याचे असे काही खास उपयोग करा.
निर्माल्याचा उपयोग कसा करायचा?
निर्माल्याचा उपयोग करण्यासाठी ते आधी एकत्र जमा करा. त्यातून विड्याची पानं, दुर्वा, जास्वंदाची फुलं वेगळी काढा. इतर सगळं सामान वेगळं करा. आता वेगळ्या काढलेल्या तीन गोष्टींचा कसा उपयोग करायचा आणि उर्वरित निर्माल्याचं काय करायचं, त्या विषयीची ही माहिती. निर्माल्यातली विड्याची पानं, दुर्वा आणि जास्वंदाची फुलं यांचा वापर करण्याआधी ती व्यवस्थित धुवून घ्या. कारण पूजेमध्ये वाहिलेलं हळद- कुंकू, गुलाल आणि इतर साहित्य त्यांच्यावर पडलेलं असू शकतं.
१. जास्वंदाची फुलं
जास्वंदाच्या फुलांचा उपयोग तेल तयार करण्यासाठी किंवा केसांसाठी हेअरमास्क तयार करण्यासाठी होऊ शकतो. जास्वंदाची फुलं खोबरेल तेलात उकळून त्याचं तेल करता येतं. हे तेल केसगळती, केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच जास्वंदाची फुलं आणि दही मिक्सरमधून एकत्र वाटून घ्या. ती पेस्ट केसांच्या मुळांशी लावा आणि एखाद्या तासाने केस धुवून टाका. हा हेअरमास्क कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
२. विड्याची पानं
विड्याच्या पानांचा उपयोग देखील केसांसाठी तेल बनवायला होऊ शकतो. यासाठी विड्याची पानं आणि जास्वंद यांचा एकत्र उपयोग करा. विड्याची पानं आणि जास्वंदाची फुलं मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करा. जेवढी पेस्ट असेल त्याच्या दुप्पट खोबरेल तेल घेऊन ते एकत्रित उकळून घ्या. ८ ते १० मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल गाळून घ्या. केसांसाठी हे तेल फायदेशीर ठरतं.
३. दुर्वा
दुर्वांचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे पिंपल्स येत असतील, तर त्यावर दुर्वांचा लेप लावून बघा. लेप तयार करण्यासाठी दुर्वा आणि दही मिक्सरमधून वाटून घ्या आणि हे मिश्रण पिंपल्सवर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. पिंपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
४. झाडांसाठी खत
वरील साहित्याव्यतिरिक्त जी काही फुलं, पानं असं जे काही विघटनशील साहित्य असेल ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि ती पावडर खत म्हणून कुंड्यांमध्ये थोडी थोडी टाकून द्या.