Join us  

लग्नानंतर ‘सोलो ट्रिप’ला जाण्याचे ५ फायदे; स्वत:साठी जोडीदारासाठीही आवश्यक आनंदी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 3:57 PM

Solo Trip After Marriage लग्नानंतर एकट्यानंच कसं फिरायला जायचं, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

नात्यामध्ये स्पेस हवी आणि मोकळेपणाही हवा. असं लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांनाही वाटते. मात्र लग्न झाल्यावर अनेकदा बायकाच स्वत:भोवती सीमा आखून घेतात, आता जबाबदारी आहे, आता कसं जमेल म्हणून बांधून टाकतात स्वत:ला. मग त्यात अनेकींचा एकटीनं प्रवास करणं थांबतं. कामासाठी जातही असतील पण सोलो ट्रॅव्हल, एकट्यानं मनसोक्त भटकंती हे बंद होतं. लग्नानंतर एकटीनंच प्रवासाला गेलं तर लोक काय म्हणतील अशी भीतीही वाटते. मात्र लग्नानंतरही एकटीनं प्रवास, सोलो ट्रॅव्हल आनंददायी असू शकतो. आणि त्यानं नातं मजबूतही होतं आणि आनंदीही.

का महत्त्वाचा सोलो ट्रॅव्हल?

स्वतःसाठी जगता आले पाहिजे

सोलो ट्रिप म्हणजे स्वत:ला भेटण्याची, स्वत:ची आवड जाणून घेण्याची संधी. स्वत:सोबत प्रवास करताना अनेक गोष्टी नव्यानं कळतात, नव्यानं विचार करायला वेळ मिळतो.

आवड वेगळी असू शकतात

तुमची व तुमच्या जोडीदाराची आवड एकच असेल असे नाही. जर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल, तर तुमच्या साथीदाराला आवडत नसेल. त्यामुळे तुम्ही सोलो ट्रिपचे आयोजन करून मनसोक्त स्वतःचा आनंद लुटू शकता.

कम्फर्ट झोनच्या चौकटीतून बाहेर पडता

सोलो ट्रीपमध्ये तुम्हाला विविध अनुभव मिळतात. घर सांभाळत असताना तुम्ही एका विशिष्ट चौकटीत अडकता. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी सोलो ट्रीप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही आपल्या जोडीदारासोबत ट्रीपला जाता तेव्हा जोडीदारावर अवलंबून असता. मात्र, सोलो ट्रीपमध्ये तुम्हाला एक स्वातंत्र्य मिळते आणि स्वतःच्या भावना हाताळण्यास एक प्रेरणा मिळते. नवीन वातावरणात तुम्हाला स्वतःहून बरेच काही शिकता आणि समजून घेता येते.

नवीन लोकांसोबत भेटीगाठी

सोलो ट्रीप तुम्हाला नवीन विश्वात घेऊन जाते. ज्यात नवीन लोकांशी मैत्री होते, भेटीगाठी घडतात. आणि या संपूर्ण ट्रीपमध्ये नवनवीन अनुभव मिळतात.  एका चौकटीतून तुम्ही बाहेर एका स्वतंत्र आकाशात उडान घेता.

नात्यात आनंदी अंतर

एकमेकांपासून थोडं लांब गेल्यावर नात्याचं, माणसांचं महत्त्वही कळतं आणि त्यातून प्रेमही वाढतं.