कुकरमध्ये भात, भाजी, पुलाव/ खिचडी अनेकदा करपून जाते. मग असा करपट कुकर (burnt pressure cooker) कितीही घासला तरी निघत नाही. कुकरच्या करपटपणा गेला नाही तर पदार्थांचा स्वाद बिघडतो तसेच कुकरमध्ये आरोग्यास हानिकारक जिवाणुंची वाढ होण्याचाही धोका असतो. स्वयंपाक करताना कुकर करपला की आपल्या नेहमीच्या डिश वाॅशर लिक्विड किंवा साबणानं घासण्याआधी काही सोप्या युक्त्या केल्यास (how to clean burnt pressure cooker) करपलेला कुकर स्वच्छ करण्यामागे खूप वेळ आणि कष्ट खर्च करावे लागत नाही.
Image: Google
करपलेला कुकर स्वच्छ करताना..
1. करपलेला कुकर स्वच्छ करण्यासाठी क्रीम ऑफ टार्टरची मदत घ्यावी. क्रीम ऑफ टार्टर हे एक ॲसिड असून ते वाइन तयार करण्यासाठी वापरलं जातं. कुकर पाण्यानं अर्धा भरावा. त्यात 2 ते 3 चमचे टार्टर ॲसिड घालावं. कुकर गॅसवर ठेवावा. पाण्याला उकळी येवू द्यावी. थोड्या वेळानं गॅस बंद करावा. कुकरमधलं पाणी काढून कुकर नेहेमीप्रमाणे घासावा . या युक्तीनं कुकर लगेच स्वच्छ होतो.
2. कुकर जर जास्तच करपलेला असेल तर काॅर्न फ्लोअरची मदत घ्यावी. यासाठी कुकर पाण्यानं अर्धा भरावा. त्यात 4 चमचे काॅर्न फ्लोअर घालावं. मोठ्या आचेवर 10-15 मिनिटं पाणी उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करावा. पाणी गार होवू द्यावं. कुकरमधील पाणी काढून टाकावं आणी नेहमीप्रमाणे कुकर घासून घ्यावा.
Image: Google
3. मिठाच्या सहाय्यानं करपलेला कुकर स्वच्छ करता येतो. मिठाचा उपयोग करुन कुकर स्वच्छ करण्यासाठी कुकर पाण्यानं भरावा. पाण्यात चमचाभर मीठ घालावं. कुकरला झाकण लावावं. कुकरला शिट्टी लावू नये. 15-20 मिनिटं पाणी उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करुन पाणी गार होवू द्यावं. पाणी गार झाल्यावर ते फेकून देवून कुकर नेहेमीप्रमाणे घासल्यास लगेच स्वच्छ होतो.
4. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांच्या सहाय्यानं स्वयंपाकाच्या वेळेस जळालेली भांडी सहज स्वच्छ करता येतात. यासाठी कुकरमध्ये पाणी घालावं. पाण्यात पाव कप व्हिनेगर घालून पाण्याला उकळी येवू द्यावी. नंतर कुकरमधलं पाणी काढून टाकावं. नंतर कुकरमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घालावा. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरताना दोन्ही गोष्टी एकत्र वापरु नये. ही काळजी घ्यावी लागते. बेकिंग सोडा घालून घासणीनं कुकर स्वच्छ घासून घेतल्यास कुकर लगेच स्वच्छ होतो.
Image: Google
5. जळलेला/करपलेला कुकर कोका कोलाच्या सहाय्यानंही स्वच्छ करता येतो. यासाठी करपलेल्या कुकरमध्ये थोडा कोका कोला घालावा. कुकर मंद आचेवर झाकण न लावता गरम होवू द्यावा. थोडा वेळानं कुकरमधील कोका कोलात बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करावा. कुकर गार झाला की नेहेमीप्रमाणे कुकर घासून स्वच्छ करुन घ्यावा. या उपायानेही करपलेला कुकर झटक्यात स्वच्छ होतो.