Join us  

डास चावल्यामुळे चेहऱ्यावर - हातापायांवर पुरळ येते, आग होते, खाज सुटते? ५ सोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 6:31 PM

5 Home Remedies for Mosquito Bites : डास चावले की अंगाची आग होते, खाज कमी होत नाही अशावेळी हे उपाय फार कामाचे...

आपल्या घराजवळ किंवा घरात डासांचा वावर असला की आपल्याला भरपूर डास चावतात. हे डास वारंवार आपल्याला चावून हैराण करतात. डास  चावल्यामुळे अंगावर येणारे पुरळ आणि खाज आपल्याला खूप त्रास देतात. डास चावल्यावर त्या भागावरील त्वचेला अधिकच खाज सुटते. खाज सुटल्याने  वारंवार खाजवल्यामुळे डास चावलेल्या ठिकाणी चट्टे उठून त्या ठिकाणची त्वचा लालसर होते. डासांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा वापर करतो. डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण मच्छरदाणीचा वापर करतो. मच्छर चावू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम त्वचेला लावतो. घरात डासांनी प्रवेश करु नये म्हणून आपण मॉस्किटो कॉईल, मच्छर मारणारे स्प्रे अशा असंख्य पर्यायांचा वापर करतो. 

डासांना घराबाहेर पळवून लावण्यासाठी कितीही उपाय केले तरीही ते आपल्यावर हल्ला करतातच. कधी कधी हे डास आपल्याला इतके चावतात की, डास चावलेल्या भागावर सूज येणे, त्वचा लालसर होणे अशा अनेक समस्या समोर येतात. डासांपासून वाचण्यासाठी आपण कितीही मॉस्किटो कॉईल, मच्छर मारणारे स्प्रे, क्रिम्सचा वापर करत असलो तरीही ते आपल्या आरोग्यासाठी हानीकारकच असते. अशावेळी आपण घरगुती उपायांचा अवलंब करुन डास चावलेल्या खुणा, खाज, पुरळ, लालसर त्वचा कमी वेळात सहज ठिक करु शकता(5 Genius Home Remedies For Mosquito Bites That Really Work). 

नक्की उपाय काय आहेत ?

१. तुळशीची पाने :- तुळशीची पाने त्वचेवरील जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकतात. तुळशीच्या पानामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खाज, जळजळ आणि लालसरपणा कमी करतात. यासाठी १ कप पाण्यात १ कप तुळशीची पाने टाका आणि गरम करा. हे पाणी उकळून अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड करा. त्यात एक कापूस बुडवून पुरळांवर लावा. यामुळे खाज येणे लगेच थांबते.

२. लसणाच्या पाकळ्या :- लसूण आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हृदयरोगापासून ते उच्च रक्तदाबापर्यंतच्या आरोग्याच्या स्थितीसाठी उपचार म्हणून लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच खाज आणि जळजळीतही लसणाचा वापर केल्यास आराम मिळतो. लसूण थेट त्वचेवर लावल्याने तुमची जळजळ किंवा जखम वाढू शकते, म्हणून प्रथम ते बारीक चिरून घ्या आणि खोबरेल तेल, कोरफड जेल किंवा कोणत्याही लोशनमध्ये मिसळा. यानंतर, प्रभावित भागावर १० मिनिटे लावल्यानंतर, ते टिश्यूने पुसून टाका.

उन्हाळ्यात डास खूप चावतात, रात्रीची झोप उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास...

३. कोरफडीचा गर लावा :- कोरफडीमध्ये असणारे अँटिसेप्टिक गुणधर्म त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. ज्या ठिकाणी डास चावला आहे त्या ठिकाणी कोरफडीचा गर लावल्यास आपल्याला त्वरित आराम मिळू शकतो. कोरफडीचा गर लावल्याने डास चावल्याच्या खुणा आणि खाज काहीवेळातच नाहीशा होतात. 

४. खोबरेल तेलाचा वापर करावा :- नारळाच्या तेलामध्ये आढळणारे अँटी - इंफ्लेमेटरी, अँटी - मायक्रोबियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म हे डास चावण्यावरही खूप प्रभावी ठरतात. डास चावलेल्या जागेवर खोबरेल तेल लावल्याने चट्टे आणि सूज येणार नाही. 

मच्छर चावतात म्हणून घरात सतत मॉस्किटो किलर प्रॉडक्टस वापरता, ३ गंभीर दुष्परिणाम...

५. हळद आणि गुलाबपाणी मिसळून लावावे :- डास चावल्यास त्या जागी गुलाबपाणी व हळद यांचे एकत्रित मिश्रण लावावे. हळदीमध्ये असणाऱ्या अँटी - इंफ्लेमेटरी व अँटी - बॅक्टेरियल या गुणधर्मांमुळे डास चावल्यावर सूज येणे, त्वचा लालसर होणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

टॅग्स :सोशल व्हायरल