लहान मुलांपासून ते घरातल्या ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच दूध लागतं. कुणाला नुसतं पिण्यासाठी तर कुणाला त्यापासून चहा, कॉफी किंवा इतर काही पदार्थ बनविण्यासाठी. पण दुधाचा वापर दररोज प्रत्येक घरात होतच असतो, हे मात्र नक्की. पण आपण ज्या दुधाचा एवढा रोज वापर करतो, ते दूध कितपत शुद्ध (purity of milk) आहे, हे पारखणं देखील गरजेचं आहे. आजकाल प्रत्येक पदार्थातच भेसळ केली जाते.
सणासुदीच्या काळात तर खवा, दूध, तूप यात भरपूर भेसळ केल्याचं आपण अनेक बातम्यांमधूनही बघतो. तसंच काहीसं दूधाचं. आपण रोज जे दूध पितो ते कितपत शुद्ध आहे, हे आपण घरच्याघरीही तपासून पाहू शकतो. काही सोप्या चाचण्या घेतल्या तर दुधातली भेसळ आपल्याही चटकन लक्षात येते. त्यासाठीच तर बघा या काही खास टिप्स आणि स्वत:च जाणून घ्या की तुमच्या घरचं दूध कितपत शुद्ध आहे. (Simple steps to check the purity of milk)
दुधातली भेसळ ओळखण्यासाठी टिप्स
१. दुधात किती पाणी आहे किंवा इतर काही भेसळीचे पदार्थ आहेत की नाही, हे ओळखण्याची ही सर्वात जुनी आणि सोपी पद्धत. यासाठी स्वयंपाक घरातील लाटणं किंवा मग त्यासारखीच एखादी गुळगुळीत लाकडी काडी वापरा. लाटणं उभं धरा आणि त्याच्या वरच्या टोकावर दुधाचे काही थेंब टाका. दुध खाली घसरलं आणि पांढरट ओघळ दिसला तर दूध शुद्ध आहे. जर दूध खाली घसरूनही पांढरट ओघळ दिसला नाही, तर ते भेसळयुक्त आहे.
२. दुधामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकून बघा. दुधाचा रंग बदलून निळसर झाला तर ते भेसळीचं आहे, हे समजावं.
३. दूध हातावर ओता आणि हात एकमेकांवर रगडा. जर हात तेलकट झाले तर ते भेसळयुक्त आहे. शुद्ध दुधात एवढा तेलकटपणा नसतो.
४. दूध उकळून जेव्हा आटतं तेव्हा जर त्यात लहान लहान गाठी दिसत असतील, तर ते भेसळीचं आहे. शुद्ध दूध आटतं आणि त्याचा रंग बदलतो. पण त्यात गाठी होत नाहीत.
५. दुधामध्ये सोयाबिन पावडर टाका. यानंतर काही वेळाने त्यात लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवा. लिटमस पेपरचा रंग निळा झाला तर दूध भेसळीचं आहे. रंग बदलला नाही, तर दूध शुद्ध आहे, हे ओळखावे.