बाहेर फाॅर्मल कामासाठी जायचं असू देत किंवा इनफाॅर्मल कामासाठी अंगावर कपडे कसे कडक इस्त्रीचे हवेत असा बहुतेकजणांचा अट्टाहास असतो. आठवणीनं धोब्याकडे कपडे इस्त्रीला टाकले जातात किंवा घरी इस्त्री असेल तर खास वेळ काढून कपड्यांना इस्त्री केली जाते. पण कधी कधी धोब्याकडे इस्त्रीला टाकलेले कपडे आणायचा विसर पडलेला असतो. तर कधी कधी प्रवासात इस्त्री केलेले कपडे सोबत नसतात आणि सोबत इस्त्रीही नेलेली नसते अशा वेळी चुरगळलेले कपडे मन मारुन घालावे लागतात. पण खरंतर त्याची काही गरज नाही. इस्त्री न करताही (unwrinkle clothing without using an iron) कपडे इस्त्री केल्यासारखे कडक दिसू शकतात त्यासाठी सोप्या युक्त्या (tips for unwrinkle clothing) आहेत.
Image: Google
1. वाॅशिंग मशिनच्या आधारे चुरगळलेले कपडे ताठ करता येतात. यासाठी कपडे ड्रायरमध्ये स्पिन करावे. स्पिन करताना कपड्यांसोबत ओला कपडा टाकावा. किंवा बर्फाचे दोन तीन खडे टाकावेत. स्पिन करताना ओल्या कपड्याची वाफ होवून किंवा बर्फ वापरल्यास तो वितळून गरम वाफ तयार होते. या गरम वाफेच्या सहाय्यानं कपडे इस्त्री केल्यासारखे कडक दिसतील.
Image: Google
2. हेअर ड्रायरचा वापर करुन कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवता येतात. त्यासाठी सपाट पृष्ठभागावर चुरगळलेला कपडा ठेवावा. हेअर ड्रायर सुरु करावं. कपड्यापासून ते काही इंच अंतरावर ठेवून हेअर ड्रायरची गरम वाफ कपड्यावर पुढील आणि मागील बाजूवरुन फिरवावी. हेअर ड्रायरची गरम वाफ फिरवण्याआधी कपड्यांवर पाण्याचे थेंंब शिंपडावेत.
3. ओलसर रुमालाचा वापर करुनही चुरगळलेले कपडे ताठ करता येतात. यासाठी सपाट पृष्ठभागावर चुरगळलेला कपडा ठेवावा. गरम पाण्यात रुमाल बुडवून तो पिळून घ्यावा. हा रुमाल कपड्यावर अंथरुन हातानं दाब द्यावा. नंतर थोडा वेळ कपडा हवेत सुकवावा.
4. घरी किंवा प्रवासात कपड्यांना इस्त्री करण्याची सोय नसल्यास 'रिंकल रिलीज स्प्रे' मिळतो तो वापरावा. ॲमेझाॅनवर रिंकल रिलीज स्प्रेचे भरपूर पर्याय मिळतील. हा रिंकल रिलीज स्प्रे कपड्यांवर फवारल्यास कपडे ताजे ताजे इस्त्री केल्यासारखे होतात. बाहेरचा स्पे वापरायचा नसल्यास असा रिंकल रिलीज स्प्रे घरच्याघरीही तयार करता येतो. त्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करावा. हा स्प्रे तयार करण्यासाठी एक भाग व्हिनेगर आणि तीन भाग पाणी घ्यावं. हा स्प्रे चुरगळलेल्या कपड्यावर मारावा आणि कपडे थोडावेळ हवेत कोरडे करावेत.
Image: Google
5. चुरगळलेले कपडे ताठ करण्यासाठी स्टीमर किंवा चहाची इलेक्ट्रिक किटली वापरावी. स्टीमर वापरत असल्यास स्टीमरमधून वाफ निघायला लागल्यावर चुरगळलेले कपडे त्या वाफेवर धरावेत. चहाची इलेक्ट्रिक किटली वापरत असल्यास किटलीत पाणी उकळायला ठेवावं. पाणी उकळलं की त्यातून निघणाऱ्या वाफेवर कपडे धरावेत. कपडे इस्त्री केल्याप्रमाणे ताठ होतात.
स्टीमर किंवा चहाची इलेक्ट्रिक किटली दोन्ही नसल्यास हातात धरता येईल अशा खोलगट भांड्यात गरम केलेलं पाणी भरावं आणि ते भांडं कपड्यावरुन फिरवल्यास कपड्यांवरील सुरकुत्या निघून जातील.